मुंबई, (प्रतिनिधी) ३ जून - आगामी १८ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व १७ अधिकृत उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईत आयोजित महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत १७ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. या संयुक्त पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे आणि भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन प्रामुख्याने उपस्थित होते.
जागावाटपावर नेत्यांचे एकमत
पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार उत्तम काम करत आहे, तर राज्यात महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घोडदौड करत आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हिताचे निर्णय धडाक्याने घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र बसून जागांचे वाटप निश्चित केले आहे. महायुतीच्या सर्व मतदारांना या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
बंडखोरांना सबुरीचा सल्ला
या निवडणुकीत महायुतीतील अनेक वर्षे काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. याबाबत बोलताना चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ज्यांनी बंडखोरी करत अर्ज भरले आहेत, त्यांनी वरिष्ठांशी बोलून आपले अर्ज मागे घ्यावेत. त्यांच्याबाबत भविष्यात सकारात्मक निर्णय घेण्याचा निर्णय काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.
उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
"महायुतीतर्फे योग्य समन्वय साधत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका घेण्यात आली आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने, त्यानंतर रिंगणात महायुतीचे केवळ अधिकृत उमेदवारच राहतील. महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन आम्ही संबंधित महापालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती आणि नगरपंचायतींच्या नगरसेवकांना केले आहे."
— खा. सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनीही यावेळी विश्वास व्यक्त केला. "ज्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त अर्ज भरले आहेत, त्यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा केली असून त्यांच्या पक्षातील कार्याचा नक्कीच सन्मान केला जाईल. त्यामुळे महायुती एकसंध राहून सर्व जागांवर विजय मिळवेल," असे ते म्हणाले.
महायुतीचे अधिकृत १७ उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ:
क्र. मतदारसंघ / जिल्हा अधिकृत उमेदवाराचे नाव
१ नागपूर डॉ. राजीव भास्करराव पोतदार
२ भंडारा-गोंदिया अविनाश आनंदराव ब्राह्मणकर
३ वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अरुण हनुमंत लखानी
४ अमरावती प्रविण रामचंद्र पोटे
५ सोलापूर राजेंद्र विठ्ठल राऊत
६ अहमदनगर प्राजक्त प्रसादराव तनपुरे
७ जळगाव नंदकिशोर भागवत महाजन
८ सांगली-सातारा धैर्यशील ज्ञानदेव कदम
९ नांदेड अमरनाथ अनंतराव राजूरकर
१० उस्मानाबाद-लातूर-बीड बसवराज माधवराव पाटील
११ औरंगाबाद-जालना सुहास त्र्यंबकराव शिरसाठ
१२ ठाणे रविंद्र सदानंद फाटक
१३ यवतमाळ दुष्यंत सतीश चतुर्वेदी
१४ परभणी-हिंगोली सईद शेरगुल खान
१५ नाशिक नरेंद्र भिकाजी दराडे
१६ रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग अनिकेत सुनिल तटकरे
१७ पुणे विक्रम संजय काकडे
?s=20