युवकांसाठी सुवर्णसंधी...  ६ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण...  रोजगाराच्या नव्या संधीही...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि किनारपट्टी भागातील युवकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या १३६ व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा (मुंबई) येथे आयोजित केले जाणार असून, इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण
मत्स्यव्यवसाय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने नौकानयनाची मूलतत्त्वे (Navigation), सागरी डिझेल इंजिनच्या विविध भागांची माहिती, त्यांची देखभाल व दुरुस्ती, तसेच आधुनिक मासेमारी साधनांचा वापर याचे सखोल सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Advertisement

जुलै ते डिसेंबर २०२६ दरम्यान प्रशिक्षण
कालावधी: १ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६
प्रशिक्षण शुल्क: दारिद्र्यरेषेखालील (BPL) प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रतिमहिना फक्त १०० रुपये, तर इतर प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रतिमहिना ४५० रुपये शुल्क आकारण्यात येईल.
पात्रतेचे निकष:
१. उमेदवार कार्यशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असावा.
२. वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
३. उमेदवाराला पोहता येणे आवश्यक आहे.
४. किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा आणि मासेमारीचा २ वर्षांचा अनुभव असावा.
५. बायोमेट्रिक ओळखपत्र किंवा आधारकार्ड असणे आवश्यक.
६. अर्जासोबत संबंधित मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस जोडणे अनिवार्य आहे.
७. दारिद्र्यरेषेखालील अर्जदारांनी गटविकास अधिकाऱ्यांचे (BDO) प्रमाणपत्र सादर करावे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि संपर्क:
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई – ६१ येथे १९ जून २०२६ पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
विजय कोळगे (मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी) - मो. ८७७९८३९७४३
जयहिंद सुर्यवंशी (यांत्रिकी निर्देशक) - मो. ७५०७९८८५५२

Advertisement

Comments

No comments yet.