"हातभट्टीची दारू अधिकृत करा!"...  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

ठाणे, (प्रतिनिधी) ३ जून - पुण्यात विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने तब्बल १८ निष्पाप जणांचा बळी गेल्याच्या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री आणि 'रिपाइं'चे प्रमुख रामदास आठवले यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र मागणी केली आहे. "कितीही कारवाया केल्या तरी हातभट्टी सहज उपलब्ध होते, त्यामुळे ती शासनमान्य करून अधिकृत करावी," असे खळबळजनक विधान आठवले यांनी केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील आरपीआयचे शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

...तर महसूल मिळेल आणि जीवही वाचेल!
पुण्यातील दुर्घटनेवर बोलताना रामदास आठवले म्हणाले, "पुण्यात विषारी दारू प्यायल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मजूर कामगारांचा मृत्यू झाला. हातावर पोट असणारा हा कष्टकरी समाज स्वस्त मिळते म्हणून हातभट्टीची दारू पितो. माझे वैयक्तिक मत आहे की, सरकारने ही हातभट्टीची दारू शासनमान्य (अधिकृत) करावी. त्यामुळे ही दारू सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरात मिळेल. त्यावर शासनाचे थेट नियंत्रण राहील, सरकारला महसूल मिळेल आणि विषारी रसायन मिसळले न गेल्याने गोरगरीब मजुरांचा जीवही वाचेल." हे आपले पूर्णपणे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले.

Advertisement

८०० रुपयांच्या फायद्यासाठी १८ जणांचा बळी
दरम्यान, पुणे येथील दारू दुर्घटनेचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी योगेशने केवळ ८०० रुपयांचा जास्तीचा फायदा मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 'ते' जीवघेणे रसायन (मिथिल अल्कोहोल) मागवले होते. ते दारूमध्ये मिसळल्यामुळेच १८ जणांचा मृत्यू झाला असून, निष्पापांच्या जीवाशी खेळणारा हा मृत्यूचा बाजार आता पोलिसांच्या रडारवर आला आहे.

अशा गंभीर परिस्थितीत केंद्रीय मंत्र्यांनी थेट हातभट्टी अधिकृत करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.