जनावरांवर उपचार करायचा आहे?  करा फक्त एक 'व्हॉट्सॲप मेसेज'... राज्य सरकारचा डिजिटल उपक्रम...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक गतिमान आणि हायटेक करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लूजन लिमिटेड (BFIL) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल सुविधेमुळे आता दुर्गम व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घरबसल्या जनावरांच्या आजारांवर तात्काळ सल्ला आणि उपचार मिळणे सोपे होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

'१९६२' हेल्पलाईन ठरतेय वरदान
पशुसंवर्धन विभागाच्या '१९६२' या टोल-फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स'ने (फिरती पशुवैद्यकीय वाहने) ग्रामीण भागात क्रांती केली आहे. आतापर्यंत राज्यातील ८ लाखांहून अधिक जनावरांवर या वाहनांच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले असून, यामुळे पशुधनाची वेळेवर आणि विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे. याच सुविधेचा विस्तार आता व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

 अशी मिळेल 'व्हॉट्सॲप'वर सेवा:
शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून +91 9063142299 या क्रमांकावर "Hi" असा व्हॉट्सॲप संदेश पाठवावा लागेल किंवा दिलेला क्यूआर (QR) कोड स्कॅन करावा लागेल.

Advertisement

घरबसल्या डॉक्टरांशी संपर्क:
या चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चॅट (Chat), ऑडिओ कॉल (व्हॉईस कॉल) किंवा व्हिडिओ कॉल (टेलिकन्सल्टेशन) द्वारे थेट संपर्क साधू शकतात आणि जनावरांच्या आजारांचे निदान करून घेऊ शकतात.

 चॅटबॉटची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला: पशुधनाचे आजार, उपचार आणि लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार.
वेळ आणि पैशांची बचत: जनावरांना दवाखान्यात नेण्याचा प्रवास खर्च आणि वेळ वाचणार.
सरकारी योजनांची माहिती: पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध.
रुग्णालय निर्देशिका: जवळील पशुवैद्यकीय रुग्णालयांची यादी (डिरेक्टरी) सहज पाहता येणार.

अवघ्या काही महिन्यांत मोठा प्रतिसाद
हा डिजिटल उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर अत्यंत यशस्वी ठरत आहे. ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ६१५ शेतकऱ्यांनी या चॅटबॉटचा यशस्वी वापर केला असून, २०१ व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकीय सल्ला पूर्ण करण्यात आला आहे.

पशुपालकांना आवाहन:
"राज्यातील पशुवैद्यकीय सेवा यंत्रणा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पशुपालक व शेतकरी बांधवांनी आपत्कालीन परिस्थितीत जनावरांच्या आरोग्यासाठी १९६२ या कॉल सेंटर सेवेचा आणि नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉटचा अधिकाधिक लाभ घ्यावा."
— डॉ. किरण पाटील (पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य)

Comments

No comments yet.