तरुण उद्योजकांसाठी मोठी संधी... उद्योग सुरू करा आणि २५ लाखांची मदत मिळवा...

Share:
Main Image
Last updated: 05-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जून - कडधान्य पिकांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि ग्रामीण भागात कृषी-आधारित उद्योगांना चालना देणे या उद्देशाने शासनाने 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान (सन २०२६-२७)' सुरू केले आहे. या अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट स्थापन करण्यासाठी नाशिक जिल्ह्याला एक घटकाचा लक्षांक मंजूर करण्यात आला आहे. पात्र शेतकरी उत्पादक संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, क्लस्टर स्तर महासंघ तसेच वैयक्तिक उद्योजकांनी ३० जून २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

२५ लाखांपर्यंत मिळणार अनुदान
या योजनेअंतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री, इमारत, गोदाम आणि साठवण सुविधांच्या निर्मितीसाठी अनुदान दिले जाईल. संबंधित बांधकाम खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान मंजूर केले जाणार आहे. हे अनुदान केवळ यंत्रसामग्री खरेदी आणि पायाभूत सुविधांसाठीच असेल; जमीन, वीज किंवा मनुष्यबळाच्या खर्चासाठी ते अनुज्ञेय असणार नाही.

Advertisement

योजनेच्या मुख्य अटी व पात्रता:
वैयक्तिक अर्जदार: अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला (स्वतः, पती/पत्नी किंवा अविवाहित मुले) या योजनेचा लाभ घेता येईल.
आर्थिक क्षमता: अर्जदाराकडे एकूण प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम आणि आवश्यक कार्यभांडवल उभारण्याची आर्थिक क्षमता असावी.
बँक कर्ज बंधनकारक: योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतरच अनुदानाचा लाभ मिळेल.
संस्थांसाठी नियम: शेतकरी उत्पादक संस्था, महासंघ आणि पतसंस्था मागील दोन वर्षांपासून नोंदणीकृत व कार्यरत असाव्यात, तसेच त्यांचे मागील दोन वर्षांचे ऑडीट (लेखापरीक्षण) रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

 आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा?
वैयक्तिक अर्जदार तसेच संस्थांनी अर्जासोबत ७/१२ आणि ८-अ चा उतारा जोडणे बंधनकारक आहे.
इच्छुक शेतकरी, संस्था आणि उद्योजकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३० जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.