आझाद मैदानावर एल्गार... हजारो असंघटित कामगारांचे ‘आक्रोश ठिय्या आंदोलन’...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ जून - केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी 'सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स' (सिटू) च्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या 'आक्रोश ठिय्या आंदोलनाला' आज दुसऱ्या दिवशी तीव्र स्वरूप प्राप्त झाले. बांधकाम, घरगुती, बिडी, ऊसतोड, यंत्रमाग यांसह विविध असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले असून, त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान दणाणून सोडले.

नेत्यांचा धोरणांवर घणाघाती हल्ला
या भव्य आंदोलनाचे नेतृत्व 'सिटू'चे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आणि सरचिटणीस एम. एच. शेख यांनी केले. यावेळी बोलताना नेत्यांनी, सरकार सध्या राबवत असलेल्या धोरणांमुळे कामगारांना पुन्हा गुलामीकडे ढकलले जात असल्याची घणाघाती टीका केली. आंदोलनात के. आर. रघु, डॉ. विवेक मॉन्टेरो, शुभा शमीम, भूषण पाटील, उज्वला पडलवार, बांधकाम कामगार नेते भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, बिडी कामगार नेत्या नसीमा शेख, घरगुती कामगार नेत्या आरमायटी इराणी, किरण मोघे, ऊसतोड कामगार नेते आबासाहेब चौगुले आणि यंत्रमाग कामगार नेते युसुफ मेजर आदींनी उपस्थित कामगारांना संबोधित केले. तसेच, डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारच्या बेरोजगारी वाढवणाऱ्या धोरणांवर जोरदार प्रहार केला.

देशाच्या विकासात ९०% योगदान देणाऱ्या असंघटित कामगारांची उपेक्षा थांबवा!
"देशात ९०% कामगार हे असंघटित क्षेत्रात असून देशाच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान सर्वात मोठे आहे. त्यामुळे सरकारने या कामगारांसाठी विशेष जबाबदारी घेऊन बजेटमध्ये भरीव आर्थिक तरतूद केली पाहिजे."
— डॉ. सुमंगला दामोदरन (सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व अर्जुन सेनगुप्ता कमिटीच्या सदस्या)

Advertisement

शाहीर संभाजी भगत यांच्या गीतांमधून प्रबोधन
क्रांतीकारी शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या झंझावाती आणि डफावरील थापेच्या साथीने कामगारांचे प्रबोधन केले. "जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडायची, गरिबांच्या मुलांना भडकवून दंगे घडवायचे आणि सत्ता काबीज करायची," असा छुपा अजेंडा राबवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा त्यांनी आपल्या गीतांमधून पर्दाफाश केला. त्यांच्या क्रांतीकारी गीतांनी आंदोलनस्थळी एक नवा जोश निर्माण केला.

कामगार मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
आंदोलनाची तीव्रता पाहता, राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाश फुंडकर यांनी 'सिटू'च्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले. या शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील तमाम असंघटित कामगारांच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना दिले व त्यावर सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळात डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले, डॉ. विवेक मॉन्टेरो, आरमायटी इराणी, किरण मोघे, भरमा कांबळे आणि आबासाहेब चौगुले यांचा समावेश होता.

 कामगारांच्या प्रमुख मागण्या:
किमान वेतन व कायमस्वरूपी रोजगार: सर्व क्षेत्रातील कामगारांना सेवेत कायम करून दरमहा किमान ३०,००० रुपये वेतन देण्यात यावे.
कल्याणकारी मंडळे: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र कल्याणकारी मंडळे स्थापन करून, त्यांना विविध शासकीय योजना लागू कराव्यात व त्यासाठी भरीव निधी द्यावा.
श्रमसंहिता रद्द करा: मालकधार्जिण्या आणि कामगारविरोधी असणाऱ्या 'चार श्रमसंहिता' रद्द करण्यात याव्यात आणि त्यांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करू नये. कामगारभिमुख कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी.
सामाजिक सुरक्षा: सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआय (ESI) आणि पेन्शन योजना लागू करावी.
योजना कर्मचाऱ्यांना न्याय: अंगणवाडी, आशा व इतर सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून किमान वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी व पेन्शन लागू करावी.
महागाईवर नियंत्रण: वाढती महागाई कमी करून स्वयंपाक आणि वाहनांसाठी स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून देण्यात यावा.
मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा 'सिटू' संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

No comments yet.