गुळात साखरेची भेसळ... स्प्रे वापरून आंबे पिकविण्याचा उद्योग... ८४ हजार किलो साठा जप्त...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) २ जून - अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या “सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र” या संकल्पनेअंतर्गत राज्यात भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेली धडक मोहीम अधिक तीव्र झाली आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी २९ ते ३१ मे २०२६ या तीन दिवसांत राज्यभरात विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किमतीचा ८४ हजार ३३५ किलो अन्नपदार्थांचा आणि भेसळीच्या साहित्याचा साठा जप्त केला आहे.

आंबे, खव्यापासून मसाल्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर जप्ती
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, सोलापूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रिम/कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ आणि शेंगदाणा चिक्की यांसारख्या असुरक्षित, कमी दर्जाच्या आणि दिशाभूल करणारे पॅकिंग असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान ४७ आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली असून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ उघड
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. तालुक्यातील तीन ठिकाणी छापे टाकून गुळात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साखरेचा १५,०९६ किलो साठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे १० लाख ६६ हजार २४२ रुपये आहे.

Advertisement

नवी मुंबईत केमिकलने आंबे पिकवणारे रडारवर
नवी मुंबईच्या वाशी येथील एपीएमसी (APMC) मार्केटमध्ये कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्यासाठी घातक अशा 'इथिलीन स्प्रे' आणि संशयीत रसायनाचा (द्रवाचा) वापर केला जात असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तीन ठिकाणी कारवाई करून सुमारे ११ लाख १२ हजार ८५० रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.

आरोग्याशी खेळणाऱ्यांवर थेट 'फौजदारी' कारवाई: तुकाराम मुंढे
अन्नात भेसळ करणाऱ्या किंवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध आता 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३' च्या कलम १२९ अंतर्गत थेट एफआयआर (FIR) दाखल करण्यात येत आहे. "जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक आणि कठोर फौजदारी कारवाई केली जाईल. ही मोहीम यापुढेही अशीच सातत्यपूर्ण आणि अधिक कडक असेल," असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

तक्रारींसाठी लवकरच नवीन 'ॲप' आणि टोल फ्री क्रमांक
नागरिकांना अन्न व औषधांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी प्रशासन लवकरच एक नवीन मोबाईल ॲप विकसित करत आहे. तसेच एक टोल फ्री क्रमांक देखील सुरू करण्यात येणार आहे.
सध्या नागरिकांना भेसळीची माहिती मिळाल्यास त्वरित एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताना नागरिकांनी स्वतःचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांकासह भेसळ होणाऱ्या आस्थापनेचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होते, याची विशिष्ट माहिती देणे आवश्यक आहे.

Comments

No comments yet.