मुंबई, (प्रतिनिधी) २९ मे - प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना एका आगामी वादग्रस्त चित्रपटामध्ये भूमिका जाहीर केल्यापासून धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाठग अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांवर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) या चित्रपटात दीपाली सय्यद एका महत्त्वाच्या राजकीय नेत्याची भूमिका साकारत आहेत. मात्र, हा चित्रपट करू नये आणि त्यात रूपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा स्वतः दीपाली सय्यद यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दीपाली सय्यद यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
एका महिला नेत्याचा फोन; धमक्यांनंतरही भूमिकेवर ठाम!
दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत हे 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या नावाने महाठग अशोक खरातच्या जीवनावर आणि त्याच्या कारनाम्यांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात आपली महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे दीपाली सय्यद यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाहीर केले होते. या मुलाखतीची बातमी प्रसिद्ध होताच त्यांना धमक्यांचे फोन येण्यास सुरुवात झाली.
दीपाली सय्यद यांनी दावा केला आहे की, "मला या चित्रपटात काम न करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. इतकेच नाही तर, एका बड्या महिला नेत्याचाही मला या संदर्भात फोन आला होता." मात्र, अशा कोणत्याही धमक्यांना किंवा दबावाला बळी न पडता आपण ही भूमिका करण्यावर पूर्णपणे ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
'रुपाली चाकणकर' यांच्या भूमिकेवरून वाद?
या चित्रपटात दीपाली सय्यद या राज्यातील ज्येष्ठ महिला नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी मिळतीजुळती भूमिका साकारत असल्याचे समजते. महाठग अशोक खरात प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या अनेक धाग्यांचा पर्दाफाश या चित्रपटात होणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात आधीच अस्वस्थता आहे. त्यातच आता थेट अभिनेत्रीलाच धमक्या येऊ लागल्याने या चित्रपटाला रिलीजपूर्वीच मोठा वाद जडला आहे.
शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी या घटनेचा निषेध केला असून कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.