हिंगोली, (प्रतिनिधी) २८ मे - एकीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन दरवाढ होत असली तरी देशात आणि राज्यात डिझेलचा तुटवडा नाही, असा दावा सरकार करत आहे. मात्र, दुसऱ्याकडे याच डिझेलअभावी हिंगोली जिल्ह्यात एका निष्पाप जिवाचा या जगात येण्यापूर्वीच अंत झाल्याची हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. हिंगोलीच्या जवळा बाजार येथे 'रुग्णवाहिकेत डिझेल नाही' असे कारण देत एका गरोदर महिलेला ऐनवेळी सेवा नाकारण्यात आली. तब्बल अडीच तास ती माऊली असह्य वेदनांनी विव्हळत मदतीची याचना करत होती. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने या महिलेला तिचे बाळ गमवावे लागले असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करून आरोग्य सुविधांचे ढोल वाजवणाऱ्या सरकारच्या काळात ही भयंकर घटना घडल्याने आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.
नेमकी काय घडली घटना?
हिंगोली येथील मनीषा इंगळे या गरोदर महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी तातडीने '१०२' आणि '१०८' या शासकीय रुग्णवाहिका क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, "रुग्णवाहिकेत डिझेल नाही," असे संतापजनक उत्तर देत कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका पाठवण्यास नकार दिला. जवळपास अडीच तास ती गरोदर महिला विव्हळत रुग्णवाहिकेची वाट पाहत होती.
अखेर हतबल झालेल्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिका शोधली आणि त्यात स्वतःच्या खिशातील ८०० रुपयांचे डिझेल भरून तिला हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तातडीने सिझरियन प्रसूती केली खरी; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वेळेत ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपचार न मिळाल्याने पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता.
"दोषींवर कडक कारवाई करा!"
"माझ्या गरोदर मुलीला जर वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली असती, तर आमचे बाळ आज जिवंत असते. डिझेल नाही म्हणून त्यांनी हलगर्जीपणा केला. या निष्पाप जिवाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे," असा टाहो दगावलेल्या बाळाच्या नातेवाईकांनी फोडला.
राकाँ (शरद पवार गट) आक्रमक; रोहिणी खडसे यांचा थेट सरकारवर प्रहार!
या हृदयद्रावक घटनेचे तीव्र राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत थेट सरकारला आणि आरोग्य प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा?
रोहिणी खडसे म्हणाल्या, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सत्ताधारी पक्षातील लोक सांगतात की राज्यात इंधनाची कोणतीही टंचाई नाही, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जर साठा उपलब्ध आहे, तर मग एका गरोदर माऊलीला डिझेल नसल्याचे कारण देऊन ॲम्ब्युलन्स का नाकारली गेली? त्या निष्पाप बाळाची एकाप्रकारे ही हत्याच झाली आहे. सरकारने सांगावे की यात दोषी कोण? आरोग्य प्रशासन, रुग्णवाहिकेचे कर्मचारी की हे अपयशी शासन? सांगा... कुणावर ३०२ चा (हत्येचा) गुन्हा दाखल झाला पाहिजे?" असा थेट आणि रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.