निवडणूक आयोगाच्या ॲपमध्ये कोणते पर्याय हवेत? आजच सुचवा

Share:
Main Image
Last updated: 05-Jan-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे. वापरकर्ता नागरिक ॲपमधील ‘Submit a Suggestion’ या पर्यायाद्वारे आपल्या सूचना नोंदवू शकतात.

ECINet ॲपच्या  प्रायोगिक आवृत्तीच्या माध्यमातून मतदारांना उत्तम सेवा पुरवण्याबरोबरच मतदानाच्या टक्केवारीचे कल त्वरित उपलब्ध करून देणे आणि मतदानानंतर फक्त ७२ तासांच्या आत इंडेक्स कार्ड प्रसिद्ध करणे अशा सुविधा पूरविणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागत होते. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ तसेच विविध पोटनिवडणुकांवेळी या ॲपची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे या ऍप मध्ये  सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता नागरिकांकडून मिळालेल्या सूचनांचेही परीक्षण करून ॲपला अधिक वापरकर्ताभिमुख बनवले जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ECINet ॲपचा अधिकृत शुभारंभ करण्याचे प्रस्तावित आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाने हा महत्त्वाकांक्षी पुढाकार घेतला आहे. ४ मे २०२५ रोजी या ॲपची घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासून  ऍप विकसित करण्याचे काम सुरू आहे.

ECINet हे एकाच ठिकाणी विविध निवडणूक-संबंधित सुविधा उपलब्ध करणारे एकात्मिक ॲप आहे. यामध्ये Voter Helpline App, cVIGIL, Saksham, Voter Turnout App, Know Your Candidate आदींसह एकूण ४० स्वतंत्र ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

Comments

No comments yet.