नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - घराच्या परिसरातील जांभळाच्या झाडावर चढण्यास मनाई केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन जणांच्या टोळक्याने काका आणि त्यांच्या पुतणीला लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना श्रमिकनगर येथील आयटीआय कॉलनीत घडली आहे. या घटनेत संशयितांनी केलेल्या दगडफेकीत पुतणी गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर पोळकर, गुडलक आणि महेश गांगुर्डे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश संतोष कोळी (रा. मारूती पार्क शेजारी, आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
जांभळे काढण्यावरून वाद
फिर्यादी कोळी यांच्या घराच्या परिसरात जांभळाचे झाड आहे. मंगळवारी (२ जून) दुपारच्या सुमारास संशयित मयुर, गुडलक आणि महेश हे कोळी यांच्या परवानगीशिवाय या झाडावर चढत असताना आढळून आले. यावेळी प्रकाश कोळी आणि त्यांच्या वृद्ध आईने संशयितांना झाडावर चढण्यास हटकले व मज्जाव केला.
माय-लेकास शिवीगाळ करत मारहाण
झाडावर चढण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या या त्रिकुटाने कोळी आणि त्यांच्या आईला भररस्त्यात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने संशयितांनी प्रकाश कोळी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने कोळी यांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत एक मोठा दगड लागल्याने कोळी यांची पुतणी जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार डिगे करीत आहेत.