नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका २४ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संशयिताच्या ब्लॅकमेलिंगचा अतिरेक झाल्याने अखेर पीडितेने धाडस दाखवून पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात 'बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण' (पोक्सो - POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयन राजेंद्र जगदाळे (वय २४, रा. प्रताप मिल जवळ, अंमळनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मैत्रीचा गैरफायदा घेऊन अत्याचार
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नयन आणि पीडित मुलगी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. या दरम्यानच्या काळात दोघांनी मोबाईलमध्ये एकत्रित फोटो काढले होते. या फोटोंचा गैरफायदा घेण्याचे संशयिताने ठरवले. गेल्या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत संशयित नयन याने जळगावहून वेळोवेळी नाशिक गाठले. "तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करेन," अशी धमकी देत त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केले.
अतिरेक झाल्याने अखेर पोलिसांत तक्रार
संशयित आरोपीकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांसह तिने अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी नयन जगदाळे विरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करीत आहेत.