कुंभमेळ्यात या वाहनांना नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात 'नो एन्ट्री'... असा आहे ट्रान्सपोर्ट आराखडा...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, हायटेक आणि कोंडीमुक्त व्हावा, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) माध्यमातून तब्बल ४,५०० बसेसचे नियोजन करण्यात आले असून, याद्वारे दररोज ३३ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याची अवाढव्य क्षमता निर्माण केली जाणार आहे.

मुख्य धार्मिक परिसरात वाहतुकीचा ताण आणि कोंडी टाळण्यासाठी पर्वणीच्या (अमृत स्नान) दिवसांमध्ये खासगी वाहनांना शहरात बंदी असेल. सर्व खासगी वाहने शहराबाहेरील ४६ पार्किंग लॉट्सवर थांबवून तिथून पुढे एसटी बसेसने भाविकांना घाटापर्यंत नेले जाईल.

तीन स्तरांवर वाहतुकीचे जाळे
कुंभमेळा प्राधिकरणाने संपूर्ण वाहतूक व्यवस्था तीन टप्प्यांत विभागली आहे:
१. शहराबाहेरील बाह्य वाहनतळ (पार्किंग).
२. अंतर्गत प्रवासी उतरविण्याची मुख्य ठिकाणे.
३. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था.

रस्ते आणि रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र 'रूट'
रस्त्याने येणाऱ्यांसाठी ३००० बसेस: ४६ बाह्य वाहनतळांवरून नाशिक शहरात येण्यासाठी ९०० बसेस, नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी १४८५ बसेस आणि त्र्यंबकेश्वर अंतर्गत भागात ३२५ बसेस धावतील. २९० बसेस राखीव असतील.
रेल्वे प्रवाशांसाठी १५०० बसेस: नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या ५ रेल्वे स्थानकांवरून भाविकांना थेट मंदिरांपर्यंत सोडण्यासाठी १५०० बसेस असतील. यातील ६८० बसेस थेट त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात येतील.

Advertisement

"शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांचे शेवटचे काही किलोमीटर सुरक्षित आणि सुलभ व्हावेत यावर आमचा भर आहे. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी ही विशेष बस व्यवस्था असेल."
— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

उपग्रहाद्वारे (Satellite) बसेसवर 'वॉच'
या महाप्रचंड वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सर्व बसेसवर उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे (GPS) देखरेख ठेवली जाईल. मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून (Integrated Control Room) कोणत्या मार्गावर गर्दी जास्त आहे, कुठे बसेसची गरज आहे आणि प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कसा कमी करता येईल, याचे 'रिअल-टाईम' मॅनेजमेंट केले जाईल.

 सिंहस्थ कुंभमेळा २०२७: वाहतुकीचा 'मेगा आराखडा' एका नजरेत
एकूण बसेस ३००० (रस्ते मार्ग) + १५०० (रेल्वे मार्ग) = ४,५०० बसेस
एकूण क्षमता दररोज ३३ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक
कनेक्टिव्हिटी ४६ बाह्य वाहनतळ आणि ५ मुख्य रेल्वे स्थानके थेट जोडणार
नाशिक-त्र्यंबकेश्वर रूट सर्वाधिक १,४८५ बसेस फक्त याच मार्गावर धावणार
राखीव बसेस आणीबाणीच्या प्रसंगासाठी ५९० बसेस रिझर्व्ह

अमृत स्नानाच्या मुख्य दिवसांमध्ये रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर परिसरात केवळ पायी चालण्यास परवानगी असेल. रेल्वे आणि एसटी महामंडळात योग्य समन्वय ठेवून २४ तासांत हजारो फेऱ्या मारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली.

Comments

No comments yet.