मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट... काय झाली चर्चा?

Share:
Main Image
Last updated: 28-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २८ मे - महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात तब्बल तासभर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांच्या हातात एक मोठी फाईल दिसून आल्याने, आगामी काळात राज्यात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे इतर बडे नेते सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत.

दिल्लीश्वरांसोबत रात्री उशिरापर्यंत खलबतं

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे प्रभारी नितीन नवीन यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे संभाव्य उमेदवारांची यादी सोपवली असून, उमेदवारांची नावे जवळपास अंतिम झाल्याचे समजते.

महायुतीचा संभाव्य जागावाटप फॉर्म्युला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांनंतर महायुतीमध्ये '११-४-२' चा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आहे:

भाजप (BJP): ११ जागा (भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे)

शिवसेना (शिंदे गट): ४ जागा

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): २ जागा

दोन जागांवर अद्याप पेच?

एकूण १७ जागांपैकी १५ जागांचा फॉर्म्युला ठरला असला, तरी उर्वरित २ जागांवरून अजूनही पूर्ण एकमत झालेले नाही. यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांची पंतप्रधानांसोबतची भेट केवळ औपचारिक नसून अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

'पंतप्रधानांकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली' - मुख्यमंत्री

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या भेटीचे तपशील दिले. "पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने नेहमीच एक नवी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. या भेटीदरम्यान राज्यातील विविध विकास प्रकल्प, लोककल्याणकारी मोहिमा आणि प्रलंबित मुद्द्यांवर पंतप्रधानांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही भेट केवळ विकासकामांसाठी होती असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते या फाईलमध्ये राज्यातील आगामी राजकीय समीकरणांचे मोठे गुपित दडलेले आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

?s=20

Comments

No comments yet.