नाशिककरांना मोठा दिलासा... हा रस्ता आता सहा पदरी होणार... नितीन गडकरी यांची मंजुरी...

Share:
Main Image
Last updated: 27-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ मे - नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची सर्वात मोठी डोकेदुखी ठरणाऱ्या द्वारका सर्कल परिसरासह पुणे रोडवरील वाहतूक आता हायस्पीड होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग-६० (NH-60) वरील 'द्वारका सर्कल - उपनगर नाका - दत्त मंदिर चौक' या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे ६-पदरीकरण (6-Lane) करण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल २२१.५२ कोटी रुपयांच्या निधीसह प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

दोन्ही बाजूंना होणार २-पदरी सेवा रस्ते (Service Roads)

नाशिक-पुणे महामार्गावरील या टप्प्यात स्थानिक वाहने आणि महामार्गावरील अवजड वाहतूक एकत्र आल्यामुळे सातत्याने अपघात आणि वाहतूक कोंडी होत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मुख्य ६-पदरी रस्त्यासोबतच, स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २-पदरी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) बांधण्यात येणार आहेत. यामुळे हायवेवरील वेगवान वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी होऊन प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर होणार आहे.

या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आणि नाशिकला होणारे फायदे:

वाहतूक कोंडीतून मुक्ती व वेळेची बचत: द्वारका ते दत्त मंदिर चौकादरम्यानचा प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून वाहतुकीचा प्रवाह गतिमान व सुरळीत होईल.

Advertisement

अपघातांना आळा: रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्यावर या डिझाईनमध्ये भर देण्यात आला असून, ब्लॅक स्पॉट्स आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल.

'स्मार्ट सिटी'ला पूरक: नाशिकच्या वाढत्या नागरीकरणाला आणि 'स्मार्ट सिटी'च्या पायाभूत उद्दिष्टांना हा प्रकल्प अत्यंत पूरक ठरणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची पूर्वतयारी: नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराची अंतर्गत आणि बाह्य संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) अधिक सक्षम करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य ध्येय आहे.

नाशिकच्या प्रगतीचा हायवे!

आगामी कुंभमेळा आणि नाशिकची भविष्यातील गरज लक्षात घेऊन या मार्गाचे रुंदीकरण अत्यंत गरजेचे होते. केंद्र सरकारच्या #PragatiKaHighway आणि #GatiShakti या अभियानांतर्गत या निधीला मंजुरी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

?s=20

Comments

No comments yet.