चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा 'आक्रोश महामोर्चा' पोलिसांनी दडपला...  रोहित पवारांसह प्रमुख नेते अटकेत...  उद्या दिल्लीत तातडीची बैठक...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

चांदवड, (प्रतिनिधी) २६ मे - कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आज चांदवड चौफुली येथे आयोजित करण्यात आलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 'आक्रोश महामोर्चा' पोलिसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक केली. "मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलकांना अटक करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झाला आहे का?" असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनात आमदार रोहित पवार, नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते.

मुंबई ते दिल्लीत हालचाली; उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक
आंदोलनकर्त्यांना अटक करून कांदा प्रश्न सुटणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला आहे. १८ तारखेला झालेल्या लासलगाव येथील आंदोलनानंतर सरकारने अवघ्या ३ रुपयांची वाढ केली होती. मात्र, आजच्या चांदवड येथील शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व एकजुटीचा धसका केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत वेगाने चक्रे फिरू लागली आहेत.
या आंदोलनाच्या दबावामुळेच उद्या (२७ मे) दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचे मोठे यश मानले जात आहे.

Advertisement

...तर पुन्हा रस्त्यावर उतरू; सरकारला इशारा
"कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नाही," असा सज्जड दम आमदार रोहित पवार आणि उपस्थित नेत्यांनी सरकारला दिला आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत जर शेतकऱ्यांच्या हिताचा आणि कांदा दराबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील. यानंतर होणारी लढाई अधिक तीव्र असेल आणि ती सरकारला पेलवणारी नसेल, असा इशारा या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आला आहे.

?s=20

Comments

No comments yet.