नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २५ मे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह सोहळा येत्या २० जून रोजी मुंबईत संपन्न होणार आहे. या हायप्रोफाइल विवाह सोहळ्याची पहिली आमंत्रण पत्रिका देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी काल रात्री दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना विवाह सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले.
वधू-वरांसह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेली ही भेट कौटुंबिक आणि अत्यंत जिव्हाळ्याची ठरली. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत वधू रेवती सुळे, वर सारंग लखानी, व्यावसायिक अरुण लखानी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी नवदाम्पत्याची आस्थेने चौकशी करत विवाहाचे निमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारले आणि वधू-वरांना आगाऊ शुभेच्छाही दिल्या.
राजकीय मतभेद बाजूला; कौटुंबिक स्नेह अधोरेखित
राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळत असला, तरी पवार कुटुंबाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत. यापूर्वीही अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हा स्नेह पाहायला मिळाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः दिल्लीत जाऊन मोदींना निमंत्रण दिल्याने या कौटुंबिक स्नेहाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
व्हीआयपी लग्नसोहळ्याकडे देशाचे लक्ष
२० जून रोजी मुंबईत होणाऱ्या या विवाह सोहळ्याला देशातील राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण स्वीकारले असले, तरी ते प्रत्यक्ष या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का? याकडे आता राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.