मुंबई, (प्रतिनिधी) २४ मे - महाराष्ट्रातील येरवडा (पुणे), ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे आता उच्च दर्जाच्या 'अध्यापन संस्थां'मध्ये (Teaching Institutes) रूपांतर करण्यात येणार आहे. "हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक दूरदर्शी पाऊल आहे," अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
५,७०० खाटांची क्षमता; पायाभूत सुविधांचा होणार पूर्ण वापर
सध्या ही चारही प्रादेशिक रुग्णालये बाह्यरुग्ण (OPD) आणि आंतररुग्ण (IPD) सेवांद्वारे हजारो रुग्णांवर उपचार करत आहेत. या रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे ५,७०० खाटांची (Beds) मोठी क्षमता असून प्रचंड पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने या रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे दर्जेदार उपचारांसोबतच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या योजनेशी सुसंगत पाऊल
मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम' अंतर्गत, 'स्ट्रेंथनिंग पीजी डिपार्टमेंट इन मेंटल हेल्थ स्पेशालिटिज' (स्कीम बी) ही योजना राबवली जात आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत (NMHP) ज्या ठिकाणी आधीपासूनच पायाभूत सुविधा आहेत, तिथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्राचा हा उपक्रम याच योजनेशी सुसंगत आहे.
'या' पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मंजुरी
राज्य शासनाने यापूर्वीच शासन निर्णय निर्गमित करून ठाणे, पुणे (येरवडा) आणि नागपूर येथील रुग्णालयांमध्ये खालील अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे:
एम.डी. सायकिअॅट्री (M.D. Psychiatry)
एम.फिल क्लिनिकल सायकॉलॉजी (M.Phil Clinical Psychology)
एम.फिल सायकियाट्रिक सोशल वर्क (M.Phil Psychiatric Social Work)
डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग (Diploma in Psychiatric Nursing)
नागपूर आणि ठाणे-पुण्यात अभ्यासक्रम यशस्वीरीत्या सुरू
नागपूरमध्ये एम.डी. सायकिअॅट्री: सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून 'एम.डी. सायकिअॅट्री' अभ्यासक्रम सुरू झाला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने दरवर्षी ४ विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून दोघांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
नर्सिंग क्षेत्रात मोठी प्रगती: ठाणे आणि पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात 'डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग' अभ्यासक्रम यशस्वीरीत्या सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दरवर्षी २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आतापर्यंत ठाणे येथून ५९ आणि पुणे येथून ६० परिचारिका (विद्यार्थी) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करून बाहेर पडल्या आहेत.
रूपांतरामुळे होणारे मुख्य फायदे:
रुग्णांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि विशेषज्ञ उपचार सेवा मिळणार.
मानसिक आरोग्य क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वाढणार.
या क्षेत्रातील संशोधनाला आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळणार.
ग्रामीण तसेच वंचित भागांपर्यंत गुणवत्तापूर्ण मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार होणार.
"केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील मानसिक आरोग्य सेवांना नवे बळ देणारा ठरेल आणि शिक्षण व सामाजिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल," असे मुख्यमंत्र्यांनी शेवटी नमूद केले.
?s=20