अतिशय संतापजनक... कांदा विकला म्हणून शेतकऱ्याला ३०१ रुपये दंड... कांदा विकला की गुन्हा केला?

Share:
Main Image
Last updated: 24-May-2026

सोलापूर, (प्रतिनिधी) २४ मे - शेतात रक्त आटवून पिकवलेला कांदा बाजारात विकायला आणायचा आणि तो विकून पैसे मिळण्याऐवजी पदरचे पैसे व्यापाऱ्याला देऊन यायचे, अशी अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र वेळ सोलापूरमधील एका कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. कांदा विक्रीतून झालेल्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्याने शेतकऱ्याला चक्क ३०१ रुपये आपल्या खिशातून भरून द्यावे लागले. हा प्रकार म्हणजे कांदा पिकवला म्हणून शेतकऱ्याला मिळालेला 'दंडच' असल्याची संतप्त भावना व्यक्त होत असून, या शेतकऱ्याची कांदा पट्टी (बिल) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
या गंभीर परिस्थितीवरून आता राजकीय वातावरणही तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी या अन्यायाविरोधात थेट आंदोलन पुकारले आहे.

नेमकं काय घडलं? (२४ गोण्या कांदा, १२ क्विंटल वजन, हाती शून्य!)
सोलापूर येथील शशीराव तोडकर या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आपला कांदा सोलापूर बाजार समितीत विकण्यासाठी अडत दुकानात आणला होता.
तोडकर यांनी एकूण २४ गोण्या कांदा आणला होता, त्याचे एकूण वजन १२.८७ क्विंटल भरले.
बाजार समितीत त्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल केवळ १०० ते १५० रुपये इतका नीचांकी भाव मिळाला.
या भावानुसार १२ क्विंटल कांद्याचे एकूण उत्पन्न १,४९६ रुपये इतके झाले.

Advertisement

उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त!
कांदा विकून १४९६ रुपये आले खरे, मात्र तोडकर यांचा वाहतूक खर्च, अडत (कमिशन), तोलाई आणि हमाली असा एकूण खर्च तब्बल १,७६७ रुपये झाला. नियमानुसार एकूण उत्पन्नातून हा खर्च वजा केला जातो. मात्र, इथे उत्पन्नापेक्षा खर्चच ३०१ रुपयांनी जास्त निघाल्याने, तोडकर यांना कांद्याचे पैसे मिळण्याऐवजी स्वतःच्या खिशातून ३०१ रुपये अडत दुकानदाराला द्यावे लागले.

आमदार रोहित पवारांचे आंदोलनाचे फर्मान
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही दुरवस्था समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "शेतकऱ्यांवर कांदा विकून खिशातून दंड भरण्याची वेळ येणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची काहीच चाड उरलेली नाही," असा घणाघात करत त्यांनी या अन्यायाविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. यामुळे आगामी काळात कांद्याचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
सध्या बाजारात कांद्याला मिळणारा भाव अत्यंत कवडीमोल असल्याने उत्पादन खर्च तर दूरच, पण वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. शशीराव तोडकर यांच्या व्हायरल झालेल्या पट्टीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. "आम्ही कांदा पिकवून गुन्हा केला का?" असा संतप्त सवाल आता महाराष्ट्रातील बळीराजा विचारत आहे.

Comments

No comments yet.