अंगणवाडी सेविकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 23-May-2026

नागपूर, (प्रतिनिधी) २३ मे - राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. अंगणवाडी सेविकेवरून 'पर्यवेक्षिका' (Supervisor) पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी सरकारने लागू केलेली ४५ वर्षांची कमाल वयोमर्यादा न्यायालयाने रद्द केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे केवळ वयाचे कारण पुढे करून अनेक वर्षे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील हजारो अनुभवी अंगणवाडी सेविकांना आता न्याय मिळणार आहे.

काय होता वादग्रस्त नियम?

महिला व बालविकास विभागाने २०२१ मध्ये एक नवीन नियम लागू केला होता. या नियमानुसार, १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदासाठी पदोन्नतीची संधी होती, परंतु त्यासाठी ४५ वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी ही वयोमर्यादा ५५ वर्षे होती, ती सरकारने कमी केली होती. या नव्या वयाच्या अटीमुळे अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ सेविकांमध्ये तीव्र नाराजी होती. अखेर या अन्यायाविरोधात काही अंगणवाडी सेविकांनी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे

Advertisement

सुनावणीदरम्यान राज्य सरकारने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, जास्त वयात पदोन्नती दिल्यास संबंधित कर्मचाऱ्याचा पुढील सेवाकाळ कमी उरतो. मात्र, न्यायालयाने सरकारचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.

६५ वर्षांपर्यंत कामाची मुभा: न्यायालयाने स्पष्ट केले की, जर अंगणवाडी सेविका वयाच्या ६५ वर्षांपर्यंत सेवा देऊ शकतात, तर त्यांना वयाच्या ४५ वर्षांनंतर केवळ वयाच्या कारणावरून पदोन्नती नाकारणे पूर्णपणे अयोग्य आहे.

समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन: केवळ वयाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता किंवा क्षमता ठरवता येत नाही. सरकारच्या महिला व बालविकास विभागाचा हा नियम राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या अधिकाराविरोधात आहे.

अंगणवाडी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण

या निर्णयानंतर राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सेविकांना या निर्णयामुळे त्यांचा हक्क मिळणार आहे. आता न्यायालयाने वयोमर्यादेचा जाचक नियम रद्द केल्यामुळे, फडणवीस सरकारने कोणताही वेळ न घालवता राज्यातील अंगणवाडी सेविकांची रखडलेली पदोन्नती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करावी, अशी जोरदार मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.