गोपाळ आहेर
भारतातील राजकारण आणि सामाजिक वातावरण सध्या एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. देशातील युवकांमध्ये वाढणारी बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, वाढती महागाई, भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेलं दुर्लक्ष या सगळ्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे. आणि याच असंतोषातून गेल्या तीन-चार दिवसांत देशभरात चर्चेत आलेलं नाव म्हणजे “कॉक्रोच जनता पार्टी”.
ही केवळ एखादी सोशल मीडिया ट्रेंडिंग मोहीम नसून, युवकांच्या भावना आणि संतापाचं डिजिटल रूप असल्याचं आता स्पष्टपणे जाणवत आहे. या संपूर्ण वादाची ठिणगी ठरलं ते भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेलं एक वक्तव्य. देशातील अनेक बेरोजगार युवकांकडे कोणतंही ठोस काम नसल्याने मीडियाकडे जातात, काही सोशल मीडियावर सक्रिय होतात, काही जण RTI कार्यकर्ते बनतात आणि असे लोक म्हणजे “कॉक्रोच” असल्यासारखे आहेत. या विधानामुळे देशभरातील अनेक तरुणांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. संघर्ष करणाऱ्या, शिक्षण घेऊनही नोकरीसाठी भटकणाऱ्या युवकांचा अशा प्रकारे उल्लेख होणं, हा त्यांच्या आत्मसन्मानावर घाव असल्याचं अनेकांचं मत बनलं.
याच संतापातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३० वर्षांचा युवक अभिजीत दिपके या तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल अभियानाची सुरुवात केली.! अभिजित दिपके या क्षेत्रातील चांगला जाणकार आणि उच्चशिक्षित तरुण आहेत. पुणे शहरातून पत्रकारिता (जर्नालिझम) विषयात पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स (PR) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहेत.
कॉक्रोच जनता पार्टी या अभियानाची सुरूवात केल्याची चर्चा आता देशभर होत आहे. विशेष म्हणजे ही चळवळ पारंपरिक राजकीय पद्धतीने नव्हे, तर पूर्णपणे डिजिटल माध्यमातून वाढताना दिसत आहे. ना मोठे मोर्चे, ना सभा, ना करोडो रुपयांचा निधी - फक्त सोशल मीडिया आणि युवकांचा प्रखर असंतोष. पण हाच या चळवळीचा सर्वात मोठा आधार ठरत आहे.
अवघ्या तीन-चार दिवसांत या इंस्टाग्राम पेज @cockroachjantaparty ने तब्बल 14.7 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्सचा टप्पा गाठल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर इतक्या वेगाने वाढणारा हा प्रतिसाद पाहता, देशातील प्रस्थापित राजकीय पक्षांनाही या डिजिटल लाटेची गंभीर दखल घ्यावी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या अभियानात फक्त घोषणाबाजी नाही, तर युवकांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील समस्यांवर थेट भाष्य केलं जात आहे.
या अभियानामधून भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस भरडला जात असल्याचा आरोप केला जातो. शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना “डिग्री आहेत पण कौशल्य नाही, परीक्षा आहेत पण भविष्य नाही” अशी भावना मांडण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना “कर भरूनही सुविधा कुठे आहेत?” असा सवाल विचारण्यात येतो. तर बेरोजगारीबाबत “शिक्षित युवक निष्क्रिय बनत आहेत आणि आश्वासनं मात्र २ करोड नोकऱ्यांची दिली जात आहेत” असा रोष व्यक्त केला जातो. या चळवळीचा मुख्य उद्देश म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणे, सत्य मांडणे, युवकांचा आवाज एकत्र आणणे आणि बदलाची मागणी करणे असा संदेश त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून सातत्याने देण्यात येत असल्याचे दिसत आहेत..!
विशेष म्हणजे या अभियानाची भाषा ही पारंपरिक राजकीय भाषणांसारखी नाही. ही भाषा थेट युवकांच्या भावना व्यक्त करणारी आहे. सोशल मीडिया, मीम्स, व्हिडिओ, रील्स आणि डिजिटल मोहिमांच्या माध्यमातून ही चळवळ वेगाने पसरत आहे. त्यामुळेच Gen Z पिढी या अभियानाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होताना दिसत आहे.
आज लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करत आहेत. अनेक युवक उच्चशिक्षण घेऊनही रोजगारासाठी भटकत आहेत. देशभरात NEET पेपरफुटी प्रकारांची पाळे मुळे शोधतांना प्रशासनाच्या नाही नऊ आलेत..! राष्ट्रीय स्तरावरील नीट पेपर फुटतोच कसा? लाखो विध्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार यांना दिला कुणी..! भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेपामुळे आजच्या तरुणांचे भविष्य धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. शिक्षण घेऊनही रोजगार नाही, कर भरूनही सुविधा नाहीत, आणि प्रश्न विचारले तर तूम्ही देशद्रोही..! ही भावना आता उघडपणे सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे या अभियानाला केवळ भारतातूनच नव्हे, तर जगातील राहणाऱ्या भारतीय युवकांकडूनही समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही केवळ एखाद्या शहरापुरती मर्यादित मोहीम राहिलेली नाही. डिजिटल माध्यमामुळे काही दिवसात देशभर मतप्रवाह तयार करण्याची ताकद या आंदोलनाने दाखवून दिली आहे.
युवकांचा असंतोष दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला तर तो एखाद्या मोठ्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाची सुरूवात ठरू शकतो. बांगलादेश आणि नेपाळ यांसारख्या देशांमध्ये Gen Z च्या असंतोषाने मोठे राजकीय बदल घडवले. भारताची परिस्थिती वेगळी असली तरी युवकांमधील वाढता रोष आणि व्यवस्थेविषयीचा अविश्वास ही बाब निश्चितच गंभीर मानली जात आहे.
आज “कॉक्रोच जनता पार्टी” ही केवळ सोशल मीडियावरील मोहीम आहे की भविष्यातील एखाद्या मोठ्या जनआंदोलनाची बीजं, हे सांगणं कठीण आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, देशातील युवक आता शांत बसणारे नाहीत. ते प्रश्न विचारत आहेत, एकत्र येत आहेत आणि स्वतःचा आवाज निर्माण करत आहेत. आणि कदाचित हाच आवाज उद्याच्या भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो.