गिरीश महाजनांनी बंगळुरूत घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट... कुंभमेळ्यासाठी झाला हा महत्वाचा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 22-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ मे - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाने आता प्रशासकीय पातळीसोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरही मोठ्या समन्वयाला सुरुवात केली आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि. २१) बेंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’च्या मुख्य आश्रमात जाऊन जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची विशेष भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या देश-विदेशातील बलाढ्य स्वयंसेवक नेटवर्कचे (Volunteers) मोठे सहकार्य मिळवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रसंगी मंत्री महाजन यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अधिकृत निमंत्रण दिले, जे गुरुदेवांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले आहे.

गर्दी नियंत्रण आणि स्वच्छतेसाठी मिळणार प्रशिक्षित स्वयंसेवक

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक आणि साधू-महंत हजेरी लावतात. अशा वेळी प्रशासनासमोर गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आरोग्य आणि स्वच्छता राखण्याचे अथांग आव्हान असते. हीच बाब लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या सेवाभावी स्वयंसेवकांची मदत मिळण्याबाबत विनंती केली. यावर गुरुदेवांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविकांच्या सेवेसाठी आणि प्रशासनाच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने प्रशिक्षित स्वयंसेवक उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही दिली.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे स्वयंसेवक ‘या’ आघाड्यांवर सांभाळणार धुरा:

गर्दी आणि रांग व्यवस्थापन: रेल्वे स्टेशन, बस स्थानके आणि मुख्य शाही घाटांवर भाविकांना शिस्तबद्ध रांगेत ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करणे.

स्वच्छता आणि जनजागृती: गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी 'स्वच्छ कुंभ, हरित कुंभ' मोहिमेत सक्रिय सहभाग.

Advertisement

माहिती आणि मदत केंद्र: भाषा अवगत असणारे स्वयंसेवक देशाच्या विविध प्रांतांतून येणाऱ्या भाविकांना अचूक मार्गदर्शन आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मदत करतील.

आपत्ती व्यवस्थापन व समुपदेशन: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत कार्य करण्यासाठी संस्थेचे प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात राहतील.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनाखालील कामांचे सादरीकरण

या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या ५६० कोटींच्या ओझर विमानतळ विस्तारीकरणासह पायाभूत सुविधा, नवीन रस्ते, घाट निर्मिती, डिजिटल वे-फाइंडिंग सिस्टीम आणि स्मार्ट गर्दी नियंत्रण आराखड्याची माहिती सादरीकरणाद्वारे (Presentation) गुरुदेवांना दिली.

प्रशासनाच्या या अद्ययावत आणि वैज्ञानिक नियोजनाचे गुरुदेवांनी कौतुक केले. अध्यात्म, सेवा आणि आधुनिक प्रशासन या त्रिसूत्रीमुळे २०२७ चा कुंभमेळा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीतील प्रमुख उपस्थिती : या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी बेंगळुरू आश्रमातील विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांची पाहणी केली. या उच्चस्तरीय बैठकीस 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे स्वामी वैशंपायन जी, ॲड. विशाल चव्हाण आणि निलेश बोरा आदी उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.