मिळकत पत्रिका आणि सनद फी बाबत महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा... राज्यातील लाखो गावकऱ्यांना होणार फायदा...

Share:
Main Image
Last updated: 22-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ मे - ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायत नमुना ८ दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना ‘स्वामित्व’ योजनेतून मोफत मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) देण्यासह सनद फी पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केली. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे वाद मिटण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांना आपल्या मालमत्तेचा अधिकृत कायदेशीर हक्क मिळणार आहे.

कोकण विभागीय आयुक्तालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि महसूल व भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२३ हजार ग्रामपंचायतींमध्ये मोजणी पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत उपकरणांच्या (ड्रोन) साहाय्याने राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ३९ हजार मालमत्तांची मोजणी पूर्ण केली आहे. यामुळे आता मिळकत पत्रिका वितरणाची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होईल, असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील मालमत्तेचे अचूक मोजमाप करून त्यांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करणे हा 'स्वामित्व' योजनेचा मुख्य उद्देश आहे.

३९ लाख मालमत्तांचे काम पूर्ण

Advertisement

आतापर्यंत राज्यातील तब्बल ३९ लाख प्रॉपर्टींचे काम पूर्ण झाले असून, १८ हजार प्रॉपर्टी कार्डचे ऑनलाइन कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या गावांचे मोजणी काम पूर्ण झाले आहे, अशा गावांचे अंतिम नकाशे आणि चौकशी नोंदवही (Enquiry Register) संबंधित ग्रामपंचायतींना आता मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गावठाणच्या बाजूला २०० मीटरपर्यंत मोजणी; नागरिकांना थेट फायदा

महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत आता केवळ गावठाणच नव्हे, तर गावठाणच्या बाहेरील २०० मीटरपर्यंतच्या मालमत्तांचे मोजमाप करून ते रहिवासी भागासाठी अधिकृत केले जाईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या घरांची अधिकृत मालकी हक्काची कागदपत्रे (सनद) कोणत्याही शुल्काविना म्हणजेच मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गावस्तरावर 'नमुना ८' अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती ग्रामविकास विभागाला दिली जाईल. यामध्ये मालमत्ता धारकाचे नाव, अंतिम मिळकत भूमापन क्रमांक आणि अचूक क्षेत्रफळ यांसारख्या महत्त्वपूर्ण तपशिलांचा समावेश असेल. "स्वामित्व योजनेच्या कामात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने आणि संवेदनशीलतेने काम करावे," असे निर्देशही महसूलमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

?s=20

Comments

No comments yet.