वाहनधारकांनो नोंद घ्या... १ जुलैपासून कडक कारवाई आणि दंड...

Share:
Main Image
Last updated: 20-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० मे - राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP - High Security Registration Plate) बसवण्यासाठी आता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२६ पासून जुन्या वाहनांना ही नंबर प्लेट अनिवार्य असणार आहे.

वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट्सना बसणार लगाम
या निर्णयाबाबत माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
"वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्सचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी 'HSRP' ही अत्यंत महत्त्वाची आणि सुरक्षित यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व वाहनधारकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि वेळेत आपल्या वाहनांवर ही प्लेट बसवून घ्यावी."

Advertisement

कशी करायची नोंदणी?
वाहन मालकांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये.
HSRP नंबर प्लेट मिळवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी आणि आपली अपॉइंटमेंट (आगाऊ वेळ) निश्चित करावी.
ही संपूर्ण प्रक्रिया ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

१ जुलैपासून कडक कारवाई आणि दंड
ज्या वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत आपल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसवलेली नसेल किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली नसेल, अशा वाहनांवर १ जुलै २०२६ पासून कडक कारवाई केली जाईल. परिवहन विभागाकडून रस्त्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवून अशा वाहनांची पडताळणी केली जाईल आणि मोटार वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १ हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल, असा इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.

?s=20

Comments

No comments yet.