पार्थ पवार अन् प्रशांत किशोर यांच्या भेटीचे गुपित काय?  राष्ट्रवादीच्या 'गुलाबी' ब्रँडिंगमध्ये बदल? की आणखी काही? चर्चांना उधाण...

Share:
Main Image
Last updated: 20-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० मे - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणनीती आणि ब्रँडिंगमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि 'जनसुराज' पक्षाचे नेते प्रशांत किशोर (पीके) यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजितदादांच्या पक्षाचे सल्लागार म्हणून आता प्रशांत किशोर काम पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'डिझाईन बॉक्स'ची गच्छंती; नव्या चेहऱ्याचा शोध
यापूर्वी अजित पवार यांच्या पक्षाचा रंग बदलून, 'गुलाबी' रंगाची नवी ओळख देण्यासह पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा ‘डिझाईन बॉक्स’ या कंपनीकडे सोपवण्यात आली होती. मात्र, पक्षांतर्गत काही कारणांमुळे या कंपनीचे काम अलीकडेच थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आता आगामी काळातील निवडणुकीचे व्यवस्थापन कोणाकडे जाणार, याविषयी खल सुरू असतानाच प्रशांत किशोर यांच्यासोबतची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

...पण 'पीके' नव्हे, तर 'I-PAC' मैदान मारणार?
प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच, पार्थ पवार यांनी या चर्चा तात्काळ फेटाळून लावल्या.

Advertisement

पार्थ पवार यांचे स्पष्टीकरण:
"प्रशांत किशोर हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. ते काल मुंबईत आले असल्यामुळे आमची ही केवळ एक सदिच्छा भेट झाली. प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून व्यावसायिक काम पाहणे काही काळापूर्वीच पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे आमच्यात कोणताही व्यावसायिक करार किंवा राजकीय सल्लागार म्हणून काम पाहण्याचा विषय झालेला नाही."

पार्थ पवारांनी हा दावा केला असला, तरी राजकीय तज्ज्ञांच्या मते, प्रशांत किशोर यांनी वैयक्तिक काम बंद केले असले, तरी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालणारी 'आय-पॅक' (I-PAC) ही नामांकित कंपनी अजूनही देशात राजकीय रणनीतीचे काम पाहत आहे. नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता ते राजकारणी बनलेल्या 'थलापती' विजय यांच्या पक्षासाठी याच आय-पॅक कंपनीने निवडणूक रणनीतीचे काम यशस्वीपणे पाहिले होते. त्यामुळे थेट 'पीके' नसले, तरी त्यांच्याच 'I-PAC' या कंपनीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.