'राष्ट्र प्रथम' भावनेचा आदर... अमित साटम यांचा मुलीबाबत मोठा निर्णय... मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद...

Share:
Main Image
Last updated: 19-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ मे - राजकारणात आणि समाजकारणात 'राष्ट्र प्रथम' हा विचार नेहमीच मांडला जातो, मात्र तो प्रत्यक्ष कुटुंबात आणि लहान मुलांच्या मनावर कसा बिंबवला जाऊ शकतो, याचे एक अत्यंत आदर्श उदाहरण मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कुटुंबाने समोर आणले आहे. त्यांची १२ वर्षांची कन्या माहीका साटम हिने नुकताच कराटेमध्ये 'ब्लॅक बेल्ट' मिळवून मोठी झेप घेतली आहे. तिची दक्षिण कोरियाची राजधानी सोल (Seoul) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवडही झाली होती. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आवाहनाचा आदर राखत साटम कुटुंबाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद निर्णयाची माहिती स्वतः अमित साटम यांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा आदर

देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देशहितासाठी देशवासियांना काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक सजग नागरिक म्हणून प्रतिसाद देणे आपले कर्तव्य मानत, साटम कुटुंबाने आपल्या १२ वर्षांच्या मुलीचा आंतरराष्ट्रीय प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.

"स्पर्धा येतात आणि जातात, राष्ट्र सर्वोपरि!"

या धाडसी आणि कौतुकास्पद निर्णयाबाबत भावना व्यक्त करताना अमित साटम म्हणाले,

Advertisement

"माझी मुलगी माहीका ही नुकतीच कराटे ब्लॅक बेल्ट झाली, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तिला सोल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. परंतु, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करत, आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एकमताने निर्णय घेतला आहे की, माहीका या स्पर्धेसाठी सोलला जाणार नाही."

"आमची खात्री आहे की, स्पर्धा येतात आणि जातात... भविष्यामध्ये माहीकाला अशा अनेक मोठ्या संधी मिळतील. पण 'राष्ट्र प्रथम' ही भावना मनामध्ये ठेवून देशहितासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे."

१२ वर्षांच्या चिमुरडीच्या समजूतदारपणाचे कौतुक

अमित साटम यांनी या निर्णयात त्यांच्या मुलीने आणि पत्नीने दाखवलेल्या सकारात्मकतेबद्दल जाहीर आभार मानले आहेत. एका १२ वर्षांच्या खेळाडू मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची मोठी संधी समोर असतानाही, देशाप्रती असलेल्या भावनेतून जो समजूतदारपणा दाखवला, तो कौतुकास्पद आहे.

"माझी पत्नी व विशेषतः मुलगी माहीका या दोघींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी समजूतदारपणे आणि सकारात्मकतेने या निर्णयाला साथ दिलीत, यासाठी मी ऋणी आहे. देशहित सर्वोपरि. जय हिंद! जय महाराष्ट्र!" अशा शब्दांत अमित साटम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या निर्णयामुळे साटम कुटुंबावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.