लासलगाव, (प्रतिनिधी) १८ मे - कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणांविरोधात आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा प्रचंड रोष पाहायला मिळाला. कांद्याला न्याय्य भाव मिळावा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी बाजार समितीत भव्य 'ट्रॅक्टर मोर्चा' काढला. एवढेच नव्हे तर संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडत, 'कांदा-भाकर' खाऊन सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी केले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.
उत्पादन खर्चही निघेना; वाहतूक भाडे खिशातून देण्याची वेळ
आंदोलनादरम्यान शेतकरी नेत्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सध्या कांद्याचा उत्पादन खर्च किलोमागे १७ ते २० रुपये येत असताना, बाजार समित्यांमध्ये मात्र कांद्याला अवघा साडेबारा (१२.५०) रुपये भाव मिळत आहे. हा शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा विकून वाहतुकीचे भाडेही निघालेले नाही, त्यामुळे पदरचे पैसे देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. "आज रस्त्यावर बसून कांदा-भाकर खाण्याची वेळ या सरकारने आमच्या बळीराजावर आणली आहे. कांद्याला योग्य भाव दिला नाही, तर उद्या हाच शेतकरी सरकारच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
थेट बाजार समितीत खरेदी: सरकारने 'नाफेड'च्या जाचक अटींऐवजी थेट बाजार समित्यांमध्येच शेतकऱ्यांचा सर्व कांदा २५ रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा.
नुकसानभरपाई अनुदान: यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागला, त्यांना सरकारने १५ ते २० रुपये प्रति किलोप्रमाणे तातडीने अनुदान द्यावे.
महाविकास आघाडीचे खासदार अन् नेत्यांची जंगी उपस्थिती
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रमुख नेते लासलगावात दाखल झाले होते. यामध्ये खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे (गुरुजी), आमदार सुनील भुसारा, माणिकराव शिंदे, डॉ. गुंजाळ, लासलगाव बाजार समितीचे उपसभापती संदीप पुंडलिक दरेकर, संचालक जयदत्त काका होळकर, सोनियाताई सत्यजीत होळकर, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बंडू सुरशे, नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) नितीन आहेर, निफाड पूर्व तालुकाप्रमुख शिवा सुराशे, निफाड तालुकाप्रमुख विक्रम रधवे, संतोष पानगव्हाणे, सद्दाम शेख, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते गुणवंत होळकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास चांदर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो कांदा उत्पादक शेतकरी ट्रॅक्टरसह आंदोलनात सहभागी झाले होते.
...तर अधिक तीव्र आंदोलन करणार!
"राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहता सरकारने यावर तातडीने आणि गांभीर्याने निर्णय घ्यावा, हीच अन्नदात्याची अपेक्षा आहे. सरकारने वेळीच दखल घेतली नाही, तर शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून यापुढे संपूर्ण राज्यात अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन उभारले जाईल," असा इशारा उपस्थित खासदार आणि आमदारांनी संयुक्तपणे सरकारला दिला आहे.