पुणे, (प्रतिनिधी) १८ मे - पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय (कॅन्सर हॉस्पिटल) हे आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP Model) निर्माण झालेले हे केंद्र भविष्यात आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
पुणे महानगरपालिका आणि 'आपुलकी हेल्थकेअर' यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, उपमहापौर परशुराम वाडेकर, महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी मान्यवर उपस्थित होते.
वेळेत निदान आणि उपचारांवर मुख्यमंत्र्यांचा भर
लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सद्यस्थितीत कर्करोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. हा आजार गंभीर असला तरी वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही येतो. हीच बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसू नये व वेळेत उपचार मिळावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध शासकीय आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा प्राधान्याने समावेश केला आहे.
महाराष्ट्रात उभारले जातेय ‘कर्करोग ग्रीड’
राज्यातील आरोग्य सुविधांच्या विस्ताराबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ (Cancer Grid) तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व भागांतील रुग्णांना अधिक सक्षम, आधुनिक आणि सुलभ उपचार सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यभरातील कॅन्सर उपचारांचे जाळे अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे महानगरपालिका आणि आपुलकी फाउंडेशनने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक भावनेतून उभारलेल्या या रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध उपचार विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या विशेष सुविधांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, आपुलकी फाउंडेशनचे प्रतिनिधी, शहरातील नामवंत वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.