मुंबई, (प्रतिनिधी) १८ मे - ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने आणि सोन्यासारख्या पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाऊन निघणारा जेजुरी गडकोट आता एका नव्या आणि सुरक्षित बदलाचा साक्षीदार होणार आहे. जेजुरी गडावरील भक्तांचे श्रद्धास्थान असलेला ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाविकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि भंडाऱ्याची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) लवकरच एक विशेष धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
विधानसभेतील प्रश्चानंतर सरकारचे पाऊल
काही काळापूर्वी जेजुरी गडकोटावर भंडारा उधळताना आग लागल्याची एक दुर्घटना घडली होती. या गंभीर घटनेबाबत लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर, भंडाऱ्याची सुरक्षितता, शुद्धता आणि विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार विक्रम पाचपुते, आमदार महेश शिंदे, आमदार राजू नवघरे आणि एफडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भेसळ करणाऱ्यांवर होणार थेट कायदेशीर कारवाई
जेजुरीसह राज्यातील विविध देवस्थानांच्या ठिकाणी मिळणारा हळद भंडारा हा पूर्णपणे शुद्ध हळदीच्या स्वरूपातच असावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्न परवाना अनिवार्य: आता जेजुरीतील सर्व भंडारा विक्रेत्यांना अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ (FSSAI) नुसार अधिकृत अन्न परवाना घेऊनच विक्री करावी लागणार आहे.
कारवाईचा बडगा: परवाना बंधनकारक केल्यामुळे केमिकल किंवा भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणे स्थानिक प्रशासनाला शक्य होणार आहे.
जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाचा ‘अॅक्शन प्लॅन’:
१. सुरक्षिततेचे नियम: मंदिर परिसरात भंडारा कसा उधळावा आणि वापरावा, याबाबात सुरक्षेचे कडक नियम लागू केले जातील.
२. जनजागृती फलक: भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि शुद्ध भंडाऱ्याची ओळख पटवण्यासाठी गडावर ठिकठिकाणी माहितीफलक लावले जातील.
३. गुणवत्ता तपासणी: आरोग्य आणि एफडीए विभागाद्वारे भंडाऱ्याच्या साठ्याची व गुणवत्तेची वेळोवेळी विशेष तपासणी मोहीम राबविली जाईल.
औषध की प्रसाद? कायदेशीर वर्गीकरण ठरणार महत्त्वाचे
सामान्यतः कायदा व प्रशासनात 'भंडारा' म्हणजे मोफत अन्न वितरण (लंगर) असा अर्थ घेतला जातो. परंतु, जेजुरीत तो सुक्या हळदीच्या स्वरूपात पूजेसाठी आणि कपाळाला लावण्यासाठी वापरला जातो. हळदीचा वापर सौंदर्य किंवा उपचारासाठी केल्यास तो 'औषध व सौंदर्यप्रसाधने' कायद्यात येतो, मात्र जेजुरीत तो ‘धार्मिक विधी’ आणि ‘प्रसाद’ म्हणून वापरला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन त्याचे विशेष नियमावलीद्वारे वेगळे नियमन करणार आहे.
"जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची पवित्रता आणि शुद्धता राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा खेळ होऊ दिला जाणार नाही. त्यांना सुरक्षित आणि १०० टक्के शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— नरहरी झिरवाळ, (अन्न व औषध प्रशासन मंत्री)
सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जेजुरीच्या भंडाऱ्याला एक कायदेशीर ओळख मिळणार असून, देवस्थान परिसरातील ड्रग्ज किंवा इतर भेसळयुक्त रसायनांच्या विक्रीला पूर्णपणे आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.