या विभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी आता प्रशिक्षण अनिवार्य... राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ मे - "राज्यातील जलसंधारण आणि भूमी व्यवस्थापन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना 'वाल्मी' (WALMI) संस्थेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे," अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर आणि 'वाल्मी'चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मिळणार प्राधान्य
मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले की, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) ही राज्यातील एक महत्त्वाची प्रशिक्षण संस्था आहे. क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जलव्यवस्थापन, मृदसंवर्धन आणि शासनाच्या विविध योजनांची तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यासाठी किमान १० ते १२ दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक असेल, ज्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

वाल्मीमध्ये कृषी पर्यटनालाही चालना
प्रशिक्षण कार्यक्रमांसोबतच वाल्मी संस्थेच्या उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले. "वाल्मी परिसराचा सर्वांगीण विकास करून तिथे कृषी पर्यटनासारखे अभिनव उपक्रम राबवावेत, जेणेकरून या संस्थेच्या व्याप्तीत वाढ होईल," असेही त्यांनी सुचवले.

Advertisement

या निर्णयामुळे जलसंधारण विभागाच्या कामात अधिक पारदर्शकता आणि वेग येईल, तसेच अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

No comments yet.