नाशिक, (प्रतिनिधी) १६ मे - राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आल्याच्या घटनेला आज (दि. १७ मे २०२६) दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) संयुक्त प्रयत्नांमुळे राज्यभरात तब्बल ३५ भोंदू बाबांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचे ढोंगी दरबार उधळून लावण्यात आले आहेत, अशी धक्कादायक माहिती 'अंनिस'चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.
सर्वच धर्मांतील भोंदूंना दणका; सनातनी आरोप फोल!
नाशिकच्या खरात प्रकरणानंतर राज्यभरातून पीडित महिला आणि नागरिकांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्या ३५ भोंदू बाबांच्या यादीत सर्वच धर्मांतील भोंदूंचा समावेश आहे. त्यामुळे "अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते," या काही सनातनी संघटनांच्या आरोपांना या कारवाईतून सणसणीत उत्तर मिळाले असून, हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे.
महिलांची आर्थिक लूट आणि लैंगिक शोषण
दाखल झालेल्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये भोंदू बाबांनी ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना भीती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये विशेषतः महिलांवर होणारे शारीरिक शोषण (लैंगिक अत्याचार) आणि आर्थिक लुटीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यापूर्वी सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीपोटी अनेक पीडित महिला समोर येत नव्हत्या; मात्र अशोक खरातवर झालेल्या कारवाईनंतर महिलांना लढण्याची हिंमत आणि न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर २०१३ मध्ये 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा' अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. शासनाकडून या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत काही अंशी सुस्तपणा दिसत असला, तरी 'अंनिस'ने आपल्या मर्यादेत राहून केलेल्या प्रबोधनामुळे हे गुन्हे दाखल करण्यात यश आले आहे.
राज्यभरात गुन्हे दाखल झालेल्या ३५ भोंदूंची यादी:
क्र. भोंदू बाबाचे नाव व ठिकाण
१ अशोक कुमार खरात, नाशिक
२ गाडगेबाबा राजेंद्र गाडगे, संगमनेर (अहिल्यानगर)
३ चेतन सुनील माळी, मूर्तिजापूर (अकोला)
४ पंकज देवराम घोलप, येडगाव (पुणे)
५ मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी (सोलापूर)
६ नाना बर्डे, आळे फाटा (पुणे)
७ ऋषिकेश वैद्य, वसई (मुंबई)
८ अल्ताफ रईस खान, मालाड (मुंबई)
९ रिधम पांचाळ, मालाड (मुंबई)
१० गणेश शिंदे, श्रीरामपूर (अहिल्यानगर)
११ अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा, नवी मुंबई
१२ विठोबा वाल्मीक जाट, सातपूर (नाशिक)
१३ किसन तळपे, मंदोशी (खेड)
१४ महेशगिरी उर्फ महेश काकडे, लासलगाव (नाशिक)
१५ अब्दुल रशीद शेख, खालापूर (रायगड)
१६ इरफान नियाज अहमद, कांदिवली (मुंबई)
१७ अनिल सोलोमन सिंग (पादरी), पुणे
१८ शिवराम पराश सावर, पालघर
१९ अल्ताफ हसन मदारी, जळगाव
२० नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी (सोलापूर)
२१ पिंटू धुमाळ, बारामती (पुणे)
२२ हेमदास किसन बावणे, अड्याळ (भंडारा)
२३ चंद्रकांत राजेंद्र माळी, इगतपुरी (नाशिक)
२४ अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर (अहिल्यानगर)
२५ औदुंबर गडदे, स्वारगेट (पुणे)
२६ नवनाथ गवळी, खेड (पुणे)
२७ शाहिद शेख, खडकपाडा (कल्याण)
२८ शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा (अहिल्यानगर)
२९ ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली (नांदेड)
३० रमेश गुप्ता, मालाड (मुंबई)
३१ हरिगिरी दत्तगिरी महाराज, भाग्यनगर (नांदेड)
३२ मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित, ठाणे
३३ कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते, देवपूर (धुळे)
३४ यशवंत एकनाथ थोरात, पारनेर (अहिल्यानगर)
३५ श्याम महाराज राठोड, दिघी (पुणे)
"दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून असे स्पष्ट होते की, ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही भोंदूगिरीचे पेव फुटले आहे. बहुतांश सर्वच धर्मांतील भोंदूंवर गुन्हे दाखल झाल्याने, 'अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच होते' हा काहींचा दावा आता पूर्णपणे फोल ठरला आहे. आणखीही पीडितांनी न घाबरता पुढे येण्याची गरज आहे."
— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस