या तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार... मनोज जरांगे यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

जालना, (प्रतिनिधी) १६ मे - "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मराठा समाजाबद्दल द्वेषाने भरलेली असून त्यांनी मराठ्यांचे वाटोळे करण्याचे काम केले आहे," असा थेट आणि गंभीर आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या पुढील रणनीतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना ते अत्यंत आक्रमक झाले होते. फडणवीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

"गोड बोलून सरकारने पाठीत खंजीर खुपसला"

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला आणि त्याची अंमलबजावणी केली, तेव्हा आम्ही सरकारचे कौतुकही केले. १०८ कुणबी प्रमाणपत्रे वाटली, पण त्यानंतर काय? सातारा संस्थानचा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढू असे आश्वासन देण्यात आले होते, त्याला आता ८ महिने उलटून गेले तरी तो जीआर का निघाला नाही?"

प्रशासकीय दिरंगाईवर उपस्थित केले प्रश्न:

गुन्हे मागे घेण्याचे काय झाले?: आंदोलकांवरील सर्व खोटे गुन्हे मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, मात्र अद्यापही गुन्हे मागे घेतलेले नाहीत.

व्हॅलिडीटी देण्यास नकार: ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र (Validity) देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Advertisement

शिंदे समितीचे काम ठप्प: शिंदे समितीकडून नवीन रेक्ॉर्ड शोधण्याचे काम आता जवळपास ठप्प झाले आहे.

लेकरांच्या भवितव्यासाठी पुन्हा आंदोलनाचा एल्गार

"मुख्यमंत्री फडणवीस यांना निवडणुकीत मराठ्यांची मते आणि मराठा नेते लागतात, पण भाजपमधील मराठ्यांची मुले मोठी होऊ नयेत, अशी त्यांची भावना आहे," अशी जळजळीत टीका जरांगे यांनी केली. "तुमची मुले जशी तुम्हाला सोन्यासारखी वाटतात, तशी आमचीही मुले आम्हाला प्रिय आहेत. दुसऱ्याची मुले मेली तरी चालतील या मानसिकतेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे," असा इशारा देत त्यांनी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.

अंतरवाली सराटीत घोषणा

सरकारविरोधात मराठा समाजात पुन्हा एकदा तीव्र नाराजी पसरली असून, पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख निश्चित करण्यासाठी अंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीत मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असे ठरले आहे. अंतरावली सराटे येथे ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला आहे.

?s=20

Comments

No comments yet.