१० वर्षांत ३ हजार गावांचे पालटले नशीब... २१०० कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक क्रांती... रिलायन्स फाउंडेशनचे यश...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १५ मे - रिलायन्स फाऊंडेशन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ORF) यांनी ग्रामीण विकास क्षेत्रातील गेल्या दशकातील कार्याचा सखोल अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासानुसार, देशातील चार राज्यांतील ३ हजार गावांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे ग्रामस्थांच्या जीवनमानात आणि उपजीविकेत लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

चार राज्यांतील २१०० कुटुंबांचा आढावा

हा अभ्यास प्रामुख्याने ओडिशा (बलांगीर), मध्य प्रदेश (मंडला), आंध्र प्रदेश (आदोनी) आणि गुजरात (राधनपूर) या भागांतील उपक्रमांवर आधारित आहे. या संशोधनात २,१०० हून अधिक कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत झालेल्या बदलांचे मूल्यांकन करण्यात आले. मजबूत स्थानिक संस्था आणि सामूहिक लोकसहभाग यामुळेच गावे स्वावलंबी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे मत: तंत्रज्ञान आणि लोकसहभाग महत्त्वाचा

Advertisement

नवी दिल्ली येथे आयोजित चर्चासत्रात रिलायन्स फाऊंडेशनचे मुख्य विकास अधिकारी सुदर्शन सुची यांनी सांगितले की, "जेव्हा गावातील लोक एकत्र येऊन स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतात आणि स्थानिक संस्था सक्षम होतात, तेव्हाच गाव खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनते." तर 'ओआरएफ'चे उपाध्यक्ष डॉ. निलांजन घोष यांनी स्थानिक गरजांनुसार विकासकामे करण्यावर भर दिला.

भविष्यातील दिशा: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युवक

रिलायन्स फाऊंडेशनच्या ग्रामीण परिवर्तन कार्यक्रमाचे प्रमुख अभिनव सेन यांनी आकडेवारी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने ग्रामपंचायती अधिक हायटेक आणि सक्षम करण्याचे उद्दिष्ट मांडले. या चर्चेत महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयांवरही मंथन झाले.

९.७ कोटी जनतेपर्यंत पोहोच

रिलायन्स फाऊंडेशनने आतापर्यंत शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांतून देशभरातील ९.७ कोटींहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. हा नवा अहवाल आगामी काळात ग्रामीण धोरणे आखण्यासाठी धोरणकर्त्यांना दिशादर्शक ठरणार आहे.

Comments

No comments yet.