मुंबई, (प्रतिनिधी) १३ मे - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून, १५ मे २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
योजनेसाठीच्या पात्रता अटी:
रहिवासी: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
आरोग्य: लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे अनिवार्य आहे.
७५ वर्षांवरील नागरिकांना विशेष सवलत
या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासोबत जीवनसाथी किंवा एका सहाय्यकाला नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वयोवृद्ध नागरिकांना प्रवासादरम्यान आधार मिळू शकणार आहे.
शासनातर्फे मोफत सुविधा
निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था शासन नियमानुसार केली जाणार आहे. अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास किंवा अर्ज अपूर्ण असल्यास तो तात्काळ रद्द करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कुठे संपर्क साधाल?
इच्छुक नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून ते सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.