अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १३ मे - न्यायप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि "न्याय आपल्या दारी" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत 'समाधान समारोह' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा समारोप २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष लोकअदालतीने होणार असून, वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
२४ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा होणार
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण २४ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, ती या विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, ज्या पक्षकारांना आपली सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे परस्पर संमतीने मिटवण्याची इच्छा आहे, त्यांनाही ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेतून पक्षकारांची सुटका होणार आहे.
ऑनलाईन सहभागाचीही सुविधा
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या लोकअदालतीचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षकार यात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासोबतच आभासी पद्धतीने (ऑनलाईन) देखील सहभागी होऊ शकतात.
येथे साधा संपर्क
या विशेष उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी पक्षकारांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर किंवा तालुक्यातील विधी सेवा समिती (संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड आणि अकोले).
दूरध्वनी क्रमांक: ८५९१९०३६१६
ई-मेल: dlsanagar@gmail.com
संमती-आधारित प्रक्रियेद्वारे जलद न्याय मिळवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.