अहिल्यानगर, (विशेष प्रतिनिधी) १३ मे - नाशिक-अहिल्यानगर 'ई-शिवाई' बसमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेने शहरात मोठे वादळ निर्माण झाले आहे. या घटनेचा 'ट्रॅव्हल जिहाद' असा उल्लेख करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजतर्फे काल तीव्र आंदोलन करण्यात आले. अखेर पोलिसांनी संबंधित वाहकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, ७ एप्रिल रोजी तारकपूर आगाराची ई-शिवाई बस (एमएच ०४, एम.आर. ८१६७) नाशिकला गेली होती. यावेळी नूर मोहम्मदसिराज पटेल हा बसवर वाहक म्हणून कार्यरत होता. नाशिकहून अहिल्यानगरकडे परत येत असताना सिन्नर येथून एक महिला बसमध्ये बसली. वाटेत या महिला प्रवाशाला उलटीचा त्रास होऊ लागल्याने वाहक पटेल याने चालकाकडून प्लास्टिकची पिशवी घेऊन तिला दिली. त्यानंतर ती महिला बसच्या मागील सीटवर जाऊन बसली.
काही वेळाने वाहक नूर पटेल हादेखील त्या महिलेच्या शेजारी जाऊन बसला आणि तिच्याशी संशयास्पद हालचाली करू लागला. ही बाब बस चालक पप्पू गोसावी यांच्या निदर्शनास आली. बस अहिल्यानगरला पोहोचल्यानंतर चालकाने या प्रकाराची माहिती आगार व्यवस्थापकांना दिली.
निलंबनानंतर आता पोलिसांत गुन्हा
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर वाहक पटेल याचे कृत्य संशयास्पद आढळल्याने त्याला २५ एप्रिल रोजीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, काल सकल हिंदू समाजाने या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारले. आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. वाढता दबाव पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नूर पटेल याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत असून, अशा घटना रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.