मुंबई, (प्रतिनिधी) ११ मे - फळे आणि भाजीपाला अधिक आकर्षक दिसण्यासाठी किंवा कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने आता युद्ध पुकारले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील, असा कठोर इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. यासंदर्भात पणन संचालनालयाने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खाजगी बाजार समित्यांना कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
घातक रसायनांचा वाढता वापर
अनेक ठिकाणी फळांची गोडी वाढवण्यासाठी रसायनांचे इंजेक्शन देणे, भाजीपाल्याला गडद हिरवा रंग देण्यासाठी घातक रंगांचा वापर करणे, तसेच धान्य आकर्षक दिसण्यासाठी रासायनिक प्रक्रियेचा आधार घेतला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे.
अन्न व औषध प्रशासनासोबत 'कम्बाइंड ॲक्शन'
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले की, "शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार माल ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचणे ही आमची जबाबदारी आहे. जिथे कुठे भेसळ किंवा रसायनांचा वापर झाल्याचा संशय येईल, तिथे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या मदतीने 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६' अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील." केवळ दंड आकारून न थांबता, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही केली जाणार आहे.
पर्यावरणपूरक पॅकेजिंगवर भर
शासनाने केवळ भेसळीवरच नव्हे, तर पॅकेजिंगवरही लक्ष केंद्रित केले आहे. भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घालण्यात आली असून, त्याऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याच्या सूचना सर्व बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत.
"फळांना कृत्रिमरित्या पिकवणे किंवा भाज्यांना विषारी रंग देणे हा गुन्हा आहे. बाजार समित्यांनी नियमित तपासणी करावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी." > — जयकुमार रावल, पणन मंत्री
?s=20