'एसीबी'चा मोठा धमाका... शाखा अभियंता १५ लाखांच्या लाचेच्या जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 09-May-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ९ मे -  जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना १५ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे जळगावच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका नगरसेविकेच्या मुलाचेही नाव समोर येत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.  

नेमके प्रकरण काय?
तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील वॉर्ड क्र. १४, विनोबा नगर येथे ८० लाख ३९ हजार ७४२ रुपयांचे सिमेंट काँक्रीट रोडचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपयांचे उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी यापूर्वी अदा केलेल्या बिलाचा मोबदला आणि पुढील बिल मंजुरीसाठी प्रथम १८ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली.  

Advertisement

कारमध्ये स्वीकारली लाच
तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. ५ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानुसार, ९ मे २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. योगेश अहिरे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये त्यांच्या निळ्या रंगाच्या बलेनो कारच्या (MH-19 CV-2619) समोरील सीटखाली ठेवण्यास सांगितले. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या 'एसीबी'च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.  

नगरसेविकेच्या मुलाचा सहभाग?
या कारवाईदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लाचेच्या रकमेव्यतिरिक्त एकूण बिलाच्या ६ टक्के रक्कम एका नगरसेविकेच्या मुलाला देण्यास सांगून अहिरे यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  कारवाई करणारे पथकही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.

Comments

No comments yet.