जळगाव, (प्रतिनिधी) ९ मे - महाराष्ट्र शासनाच्या गृह परिवहन विभागामार्फत राज्यातील परवानाधारक ऑटोरिक्षा आणि मिटर टॅक्सी चालकांसाठी 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ' स्थापन करण्यात आले आहे. या मंडळांतर्गत विविध विमा आणि पेन्शन योजनांचा लाभ दिला जाणार असून, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त चालकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले आहे.
विमा, शिक्षण आणि पेन्शनचा लाभ
या मंडळाचे सभासद होणाऱ्या चालकांना आणि त्यांच्या कुटुंबाला खालील योजनांचा लाभ मिळणार आहे:
विमा संरक्षण: जीवन विमा आणि अपंगत्व विमा योजना.
आरोग्य सहाय्य: कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५०,००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य.
शिक्षण व कौशल्य: पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि कौशल्य वृद्धी कार्यक्रम.
निवृत्ती सन्मान: ६५ वर्षांवरील परवानाधारकांना सानुग्रह अनुदान (पेन्शन स्वरूपात).
कर्ज सुविधा: नवीन वाहन खरेदी किंवा गृह खरेदीसाठी सुलभ कर्ज योजना.
८०० रुपयांत वार्षिक सदस्यत्व
मंडळाचे वार्षिक सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क एकूण ८०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत १६६ पात्र सभासदांची नोंदणी झाली आहे. भुसावळ येथील दिपक मधुकर नाथ हे जळगाव जिल्ह्यातील पहिले नोंदणीकृत सभासद ठरले असून, त्यांना नुकतेच ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
अर्ज कसा करावा?
पात्र ऑटोरिक्षा आणि मिटर टॅक्सी चालकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मदत कक्षाशी (Help Desk) थेट संपर्क साधावा.
"चालकांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक परवानाधारक चालकाने या मंडळाचा भाग होऊन आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे."
— राजेंद्र वर्मा, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव.