बीड, (प्रतिनिधी) ७ मे - बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत ७३ कोटी रुपयांचा मावेजा घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक (Avinash Pathak) यांना पोलिसांनी अटक केली आहे. लातूर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे राज्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे ७३ कोटींचा घोटाळा?
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा (मोबदला) वाढवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि जुन्या तारखा वापरून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आल्याचा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, अविनाश पाठक २२ एप्रिल २०२५ रोजी बीडमधून बदली होऊन गेल्यानंतरही, त्यांच्या कार्यकाळातील मागच्या तारखांचे बनावट आदेश काढण्यात आले.
'एसआयटी'चा तपासात मोठा खुलासा
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. तपासात असे समोर आले की, १५४ प्रकरणांमध्ये जुन्या तारखा आणि बनावट सह्या वापरून तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी ७३ कोटी ४ लाख रुपयांचे वाटपही संबंधित खातेदारांना करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही नोंदवही किंवा रजिस्टर न ठेवता हा गैरव्यवहार करण्यात आला.
दिवसभर चौकशी, मग अटक
अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, पाठक यांना बीड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वीच या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सध्या या गुन्ह्याचा तपास एम. व्यंकटराम करत आहेत. या अटकेमुळे भूसंपादन प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांचे आणि दलालांचे धाबे दणाणले आहेत.