नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ४ मे - नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध 'शुभ्रा रंजन IAS अकॅडमी'च्या संचालिका शुभ्रा रंजन यांना भोपाळमध्ये बोलावून, पिस्तुलाचा धाक दाखवून १.८९ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भोपाळ गुन्हे शाखेने अत्यंत चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावत, मास्टरमाइंड प्रियंक शर्मासह सहा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्याने शुभ्रा रंजन यांच्याकडून धडे घेतले, त्यानेच या संपूर्ण कटाचा चक्रव्यूह रचला होता.
सेमिनारचे आमिष आणि 'त्या' दोन रात्रींचा थरार
मुख्य आरोपी प्रियंक शर्मा याने शुभ्रा रंजन यांना भोपाळमध्ये एका मोठ्या सेमिनारसाठी आणि अकॅडमीच्या विस्ताराच्या चर्चेसाठी निमंत्रित केले होते. त्या भोपाळला आल्यावर त्यांना एका पंचतारांकित हॉटेलमधून बागसेवनिया परिसरातील एका भाड्याच्या खोलीत नेण्यात आले. तिथे दबा धरून बसलेल्या सशस्त्र गुन्हेगारांनी त्यांना दोन दिवस डांबून ठेवले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन १.८९ कोटी रुपये 'जनकशिला' आणि 'आरएस एंटरप्रायजेस'च्या खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
आरोपींचे 'शातिर' नियोजन: धार्मिक कार्यक्रमाचा आडोसा
तपासात आरोपींच्या गुन्हेगारी कौशल्याचे धक्कादायक पैलू समोर आले आहेत:
आवाजाची भिंत: खोलीतील ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आरोपींनी तिथे मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता.
बनावट अपहरण: पीडितेला घाबरवण्यासाठी आरोपींनी आपल्याच एका साथीदाराच्या अपहरणाचा बनावट व्हिडिओ बनवून त्यांना दाखवला.
'बिमारी'चा बनाव: अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी प्रियंक शर्मा थेट एम्स (AIIMS) भोपाळच्या आयसीयूमध्ये भरती झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला तिथूनच बेड्या ठोकल्या.
पोलिसांचा 'क्विक रिस्पॉन्स': पूर्ण रक्कम सुरक्षित!
घटनेचे गांभीर्य ओळखून भोपाळ पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींनी ज्या बँक खात्यात पैसे वळवले होते, ती खाती अवघ्या काही तासांत गोठवली (Freeze). त्यामुळे १.८९ कोटींची पूर्ण रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले असून, ही रक्कम आता पीडित महिलेला परत मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.