शाही लग्नाचा खर्च कुणी केला? इंदुरीकर महाराजांनी नावच सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 04-May-2026

संगमनेर, (प्रतिनिधी) ४ मे - प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच शाही थाटात पार पडला. मात्र, या लग्नातील खर्चावरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना महाराजांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकारले आहे. "ट्रोल करणाऱ्यांच्या बौद्धिक पातळीचा हा प्रश्न असून, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

"खर्च जनतेचा नाही, तर भक्तांच्या प्रेमाचा!"
लग्नातील खर्चावर बोट ठेवणाऱ्यांना उत्तर देताना महाराज म्हणाले की, "उद्या लोक विचारतील एवढा खर्च कुठून केला? तर त्याचे उत्तर स्पष्ट आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी या लग्नाचा ९० टक्के खर्च उचलला आहे. देशमाने आणि कातोरी यांसारख्या हितचिंतकांनी हा डोलारा उभा केला आहे. त्यामुळे जनतेची लूट केली म्हणणाऱ्यांनी आधी सत्य जाणून घ्यावे."

समाजाच्या 'नासक्या' प्रवृत्तीवर ओढले ताशेरे
महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि चांगदेव पासष्टीतील दाखले देत टीकाकारांना आरसा दाखवला:

Advertisement

सोन्याची शुद्धता: "सोन्याला कोणताही आकार द्या, सोने आपले 'सोनेपण' सोडत नाही."
गुळाची गोडी: "गूळ कापा किंवा पाण्यात विरघळवा, तो गोडी सोडत नाही."
स्वभावाला औषध नाही: "काही लोकांची प्रवृत्तीच नासकी असते. त्यांना कितीही चांगले सांगितले तरी ते आपला मूळ स्वभाव (टीका करणे) सोडत नाही. पण अशी माणसेही हवीत, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या चुका कळतात."

शिक्षण आणि समाजकारणात आम्हीच पुढे!

टीकाकारांना उत्तर देताना महाराजांनी आपल्या कार्याचा पाढाच वाचला. "आम्ही मंदिर बांधायला, सप्ताह करायला आणि शाळा चालवायला कधीच मागे पडलो नाही. माझ्या विद्यालयात मी स्वतःच्या खिशातून १५ शिक्षक नेमले आहेत आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही फी घेतलेली नाही. जे लोक ट्रोल करतात, त्यांनी आधी हे कार्य बघावे," असे आवाहन त्यांनी केले.

 "गेल्या २६ वर्षांत माझ्यासोबत व्यवहार करताना कुणीही फसवणूक केली नाही. त्यामुळे ज्यांना देणाऱ्यांनी दिले आहे, त्यावर इतरांनी चर्चा करण्याचे कारण नाही."

Comments

No comments yet.