पुणे विद्यापीठ बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण संधी... हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न होणार साकार...

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - पुणे विद्यापीठाच्या काही विषयांत नापास (बॅकलॉग) झाल्यामुळे पदवीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने अंतिम आणि अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परीक्षेची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया येत्या ११ मे पासून सुरू होणार आहे.

हजारो विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

अनेक विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन विषय बॅकलॉग राहिल्याने त्यांची पदवी रखडली होती. अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. विद्यापीठाच्या या निर्णयाचा फायदा नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. यामध्ये अनुशेष विषयांसह (बॅकलॉग), समकक्ष (Equivalence), न्यायप्रविष्ठ प्रकरणे आणि तक्रार अर्जांची पडताळणी करून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ही ‘शेवटची’ संधी: सागर वैद्य

या निर्णयाबाबत माहिती देताना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य म्हणाले की, "ही एक अपवादात्मक तरतूद असून विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. प्रत्येक वर्षी अशी संधी मिळेलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा सोनं करावं, परीक्षेचा अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे आणि आपली पदवी पूर्ण करावी."

Advertisement

महत्त्वाचे मुद्दे:

अर्ज प्रक्रिया: ११ मे २०२६ पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल.

पात्रता: अंतिम आणि अंतिम पूर्व वर्षाचे बॅकलॉग राहिलेले विद्यार्थी.

नियम: समकक्ष विषय आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करूनच अर्ज स्वीकारले जातील.

वर्षानुवर्षे पदवीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून, १० मे नंतर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.