पुणे, (प्रतिनिधी) २ मे - पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला 'वासरे दाखवतो' असे सांगून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी आरोपीला कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सुट्टीत आजीकडे आली अन् घात झाला
संबंधित चिमुरडी ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या आजीकडे नसरापूर येथे आली होती. दुपारी खेळत असताना ती अचानक दिसेनाशी झाली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कोठेही आढळली नाही. अखेर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गावातीलच ६५ वर्षांचा एक मजूर तिला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला. संशय आल्याने गोठ्यात जाऊन पाहिले असता, चिमुरडीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
नराधम आहे सराईत गुन्हेगार; 'पोक्सो'तून झाली होती सुटका
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली आणि अवघ्या दीड तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याची मानसिकता विकृत आहे.
१९९८: आरोपीवर पहिल्यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
२०१५: त्याच्यावर पुन्हा 'पोक्सो' (POCSO) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०१९: या गुन्ह्यातून त्याची सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच त्याने पुन्हा हे अमानवीय कृत्य केले आहे.
खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार
"आम्ही या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. लवकरात लवकर आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा आमचा प्रयत्न असेल, जेणेकरून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल," असे एसपी संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले.
गावात तणावपूर्ण शांतता
या घटनेनंतर नसरापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोपीची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.