प्रवाशांना दिलासा... एसटी स्थानकांवर आता इतक्या रुपयांत मिळणार चहा-नाश्ता...

Share:
Main Image
Last updated: 01-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १ मे - राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा प्रवास आता अधिक सुखकर आणि खिशाला परवडणारा होणार आहे. येत्या १ जून २०२६ या एसटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महामंडळाने प्रवाशांसाठी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. आता बसस्थानकांवरील कँटीनमध्ये केवळ ४० रुपयांत चहा-नाश्ता मिळणार असून, स्थानकांवरील स्वच्छतागृहांची सुविधाही प्रवाशांना मोफत उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली आहे.

नेमकी योजना काय?

पूर्वी एसटीच्या केवळ महामार्गावरील अधिकृत थांब्यांवर (हॉटेल/ढाबे) सवलतीच्या दरात नाश्ता मिळण्याची योजना होती. आता हीच योजना राज्याच्या सर्व बसस्थानकांमधील कँटीनमध्ये लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला या थाळीची किंमत ३० रुपये होती, मात्र वाढत्या महागाईचा विचार करून आता ती ४० रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांना पोहे, उपमा, शिरा, वडापाव, इडली किंवा मेदूवडा यापैकी एक पदार्थ आणि एक कप चहा मिळणार आहे.

कँटीन चालकांना नियमावली कडक

ही योजना सर्व बसस्थानकांवरील कँटीन चालकांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. जर एखाद्या कँटीन चालकाने या दरात नाश्ता देण्यास नकार दिला किंवा नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे.

Advertisement

स्वच्छतागृहे आता मोफत

कँटीनसोबतच प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे आता पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज भासणार नाही; त्याऐवजी हे स्वच्छता शुल्क तिकिटाच्या दरातच अंतर्भूत करण्यात येणार आहे. यामुळे स्थानकांवरील अस्वच्छता आणि जादा शुल्काची वसुली थांबण्यास मदत होईल.

ऐतिहासिक वर्धापन दिनाची भेट

१ जून १९४८ रोजी पहिली एसटी बस अहमदनगरच्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीतून पुणे प्रवासासाठी निघाली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत वर्धापन दिनापासून ही नवी सेवा सुरू होत आहे. नगरच्या माळीवाडा वेशीतून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला असून, या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

?s=20

Comments

No comments yet.