नाशिक, (प्रतिनिधी) २९ एप्रिल - बुलढाणा येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर झालेल्या कारवाईनंतर राज्यभरात पीडित महिला आणि नागरिकांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत तब्बल १० भोंदू बाबांविरुद्ध गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्याने आणि काही ठिकाणी पीडितांनी स्वतःहून पुढे येत ही धाडसी पावले उचलली आहेत.
पीडितांना मिळाली लढण्याची उमेद
अशोक खरात प्रकरणाने भोंदूगिरीचा उघड झालेला अघोरी चेहरा पाहून अनेक पीडित महिलांनी आता मौन सोडले आहे. 'अंनिस'ने दिलेल्या माहितीनुसार, खरात प्रकरणानंतर महिलांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली असून, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि मुंबईसह अनेक भागांत भोंदूंनी मांडलेला बाजार उधळून लावण्यासाठी तक्रारींचे सत्र सुरू झाले आहे.
राज्यात कुठे, कोणावर झाले गुन्हे?
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी संकलित केलेली राज्यातील गुन्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
क्र. भोंदू बाबाचे नाव ठिकाण / जिल्हा
१ राजेंद्र गडगे (गडगेबाबा) संगमनेर, अहिल्यानगर
२ महेश काकडे (महेशगिरी) निफाड, नाशिक
३ चेतन सुनील माळी मूर्तिजापूर, अकोला
४ पंकज देवराम घोलप येडगाव, पुणे
५ मोहन मामा भोसले कुर्डुवाडी, सोलापूर
६ नाना बर्डे आळे फाटा, पुणे
७ ऋषिकेश वैद्य वसई, पालघर/मुंबई
८ अल्ताफ रईस खान मालाड, मुंबई
९ रिधम पांचाळ मालाड, मुंबई
१० गणेश शिंदे श्रीरामपूर, अहिल्यानगर
अंनिसचे आवाहन: पीडितांनी पुढे यावे
"खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षाही निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त, तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात वावरणाऱ्या इतरही भोंदू बाबांकडून ज्यांची फसवणूक किंवा शोषण झाले आहे, अशा पीडितांनी न घाबरता पुढे यावे," असे आवाहन अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, पोलीस प्रशासनही अशा तक्रारींची तातडीने दखल घेत आहे.