नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २९ एप्रिल - आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार राघव चड्ढा यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चड्ढा यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच, आता माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राघव चड्ढा यांना ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी त्यांची मेहुणी आणि जागतिक ख्यातीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मध्यस्थी केल्याचे नवज्योत कौर यांनी म्हटले आहे.
ED च्या कारवाईची होती भीती?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना नवज्योत कौर सिद्धू यांनी दावा केला की, राघव चड्ढा यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाची (ED) टांगती तलवार होती. या संभाव्य अटकेपासून किंवा कारवाईपासून वाचण्यासाठी प्रियांका चोप्राने आपले वजन वापरून भाजपच्या बड्या नेत्यांशी संपर्क साधला. प्रियांकाच्या मध्यस्थीनंतरच राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश सुकर झाला आणि त्यांना दिलासा मिळाला, असे कौर यांनी आपल्या दाव्यात नमूद केले आहे.
२४ एप्रिलचा तो निर्णय आणि चर्चा
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. २४ एप्रिल रोजी चड्ढा यांच्यासह 'आप'च्या सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय विश्लेषकांना धक्का बसला होता. सोशल मीडियावरही यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा चड्ढा यांचा राजकीय स्वार्थ असल्याचे म्हटले, तर काहींनी याला मजबुरी मानले.
परिणीती आणि प्रियांकाचे नाव चर्चेत
राघव चड्ढा यांची पत्नी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्याशी लग्नानंतर चड्ढा यांचे बॉलिवूड कनेक्शन अधिक घट्ट झाले आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी थेट प्रियांका चोप्राचे नाव घेतल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. प्रियांका चोप्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतात असलेले संबंध राघव चड्ढा यांच्या राजकीय प्रवासासाठी 'कवच' ठरले का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांच्या या दाव्यावर राघव चड्ढा किंवा भाजपच्या वतीने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या खुलाशामुळे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.