छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - पोलिस कोठडीतून आरोपी फरार झाल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत अजब आणि थक्क करणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका सराईत चोराने केवळ 'भूक लागली' या कारणास्तव पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत कोठडीतून पळ काढला. विशेष म्हणजे, पळाल्यानंतर कुठेही लपून न बसता हा आरोपी थेट घरी पोहोचला, तिथे त्याने पोटभर जेवण केले आणि तो गाढ झोपून गेला.
नेमकी घटना काय?
अभिषेक भूमकर ऊर्फ भैय्या असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याला एका चोरीच्या गुन्ह्यात पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, अटकेत असताना त्याला अचानक भूक लागली. रात्रीच्या वेळी पोलिसांची नजर चुकवून अभिषेकने पोलिस ठाण्यातून चपळाईने पळ काढला. आरोपी कोठडीतून गायब झाल्याचे लक्षात येताच पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आणि पथकांनी त्याचा शोध सुरू केला.
शोध घेताच घरी सापडला!
आरोपी पळाल्यानंतर रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा शहराबाहेर गेला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा तिथे जे दृश्य दिसले ते पाहून पोलिसही अवाक झाले. अभिषेक पळून कुठेही गेला नव्हता, तर तो त्याच्या घरी आरामात झोपलेला आढळला.
घरचे जेवण आणि झोप बेतली महागात
पोलिसांनी अभिषेकला तातडीने पुन्हा ताब्यात घेतले. त्याने कोठडीतून पळण्याचे कारण विचारले असता, त्याने 'खूप भूक लागली होती आणि घरच्या जेवणाची आठवण येत होती' असे पोलिसांना सांगितले. जेवण झाल्यानंतर डोळा लागल्याने तो तिथेच झोपला आणि याच गाफीलपणात तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आता या आरोपीवर कोठडीतून पळाल्याप्रप्रकरणी अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची शहरात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.