मोठ्या पक्षाकडून 'भोंदू'चे ब्रँडिंग? बागेश्वर बाबांच्या नागपूर दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापले...

Share:
Main Image
Last updated: 27-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - नाशिक आणि नागपूर दौऱ्यावर असलेल्या धीरेंद्र शास्त्री ऊर्फ 'बागेश्वर बाबा' यांच्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमांवरून कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"महत्त्व देण्याइतकी त्याची लायकी नाही" – संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख 'भोंदू' असा करत अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. "बागेश्वर बाबा मूर्ख आणि भोंदू आहे, त्याला इतकं महत्त्व देऊ नका, त्याची तेवढी लायकी नाही. उद्या त्याचंही काहीतरी अजब प्रकरण बाहेर येईल," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, अशा प्रवृत्तींचा कडक निषेध होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

"सत्ताधारी पक्षाकडून भोंदूला राजाश्रय का?" – रोहित पवार

Advertisement

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी मोठ्या पक्षावर थेट हल्ला चढवला आहे. "सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने या भोंदूचा निषेध केला आहे. महाराष्ट्राचा आधार असलेल्या महामानवांपेक्षा हा भोंदू शास्त्री त्या पक्षाला मोठा वाटतो का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र ही संतांची आणि महामानवांची भूमी आहे. इथे बाहेरून असले भोंदू बोलवायची गरजच काय? हा मोठा पक्षच या कार्यक्रमांचे प्रायोजक (स्पॉन्सर) असल्याची चर्चा आहे. नागपुरात अद्यापही या बाबाचा कार्यक्रम सुरू असणे ही लाजिरवाणी बाब असून, सरकारने तातडीने हा कार्यक्रम बंद करावा."

अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा आणि येथील वारकरी परंपरेपेक्षा कोणीही मोठे नाही, हे सरकारने दाखवून द्यावे, अशी मागणी आता विरोधी पक्षांकडून जोर धरू लागली आहे. बागेश्वर बाबांच्या दौऱ्यावरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments

No comments yet.