अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - कोविड-१९ च्या संकटामुळे लांबणीवर पडलेली बहुप्रतीक्षित 'जनगणना-२०२७' आता पूर्णपणे हायटेक आणि डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. १८७२ पासूनच्या मालिकेतील ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असून, अहिल्यानगर जिल्ह्यात या महामोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. १ मे पासून या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया
ही जनगणना प्रामुख्याने दोन टप्प्यांत पार पडणार आहे:
१. पहिला टप्पा (घरांची यादी व घरगणना): १ मे ते १४ जून २०२६.
२. दुसरा टप्पा (लोकसंख्या गणना): २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्येची मोजणी होईल.
विशेष म्हणजे, १ मे ते १५ मे २०२६ या काळात नागरिकांसाठी 'स्वयंगणना' (Self-Enumeration) ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे नागरिक या काळात आपली माहिती भरणार नाहीत, त्यांच्याकडे १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित करतील.
जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी आणि ८ हजार प्रगणक
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ३० चार्ज अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर काम करण्यासाठी ६ हजार ८६९ प्रगणक आणि १ हजार १४५ पर्यवेक्षक असे एकूण ८ हजार १४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय १० टक्के अतिरिक्त मनुष्यबळही राखीव ठेवण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सध्या तालुकास्तरावर विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
नागरिकांना विचारले जाणार ३३ प्रश्न
क्षेत्रीय सर्वेक्षणादरम्यान प्रगणकांकडून कुटुंबांना सुमारे ३३ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये घराचा प्रकार, उपलब्ध सुविधा, कुटुंबाची सामाजिक व आर्थिक स्थिती अशा विविध बाबींचा समावेश असेल. प्रथमच डिजिटल माध्यमातून माहिती संकलित केली जात असल्याने प्रक्रियेत अधिक अचूकता आणि पारदर्शकता येणार आहे.
१४ भाषांमध्ये स्वयंगणनेची संधी
नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरता येईल. हे पोर्टल १ ते १५ मे दरम्यान खुले असेल. इंग्रजी आणि हिंदीसह इतर १४ प्रादेशिक भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय येथे उपलब्ध आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणाची पाहणी
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्वतः विविध तालुका केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षण सत्रांची पाहणी केली. "जनगणना ही देशाच्या भविष्यातील नियोजनाचा पाया आहे. त्यामुळे प्रगणकांनी कोणतीही चूक न करता अत्यंत जबाबदारीने हे काम पार पाडावे," अशा सूचना डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या. तसेच, जिल्ह्यातील नागरिकांनी अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.